loksabha elecation | शिरूरमध्ये राष्ट्रवादीला ‘या’ कारणामुळे मिळाला नाही स्वपक्षीय उमेदवार.. | पुढारी

loksabha elecation | शिरूरमध्ये राष्ट्रवादीला 'या' कारणामुळे मिळाला नाही स्वपक्षीय उमेदवार..

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात चार आमदार, त्यातील एक मंत्री, अशी मजबूत स्थिती असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासून केलेल्या आमदारकेंद्री राजकारणाचा आणि आमदारांना दिलेल्या अफाट अधिकार व गैरवापराचा हा मोठा परिणाम आहे, हे स्पष्ट होते. याच लोकसभेला हे घडले असे नाही तर मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये देखील असेच घडले. या मतदारसंघातील कोणताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आणि नेता लोकसभेला इच्छुक राहात नाही. अगदी पक्षनेतृत्वाने आग्रह केला तरी हे सर्व आमदार आणि मंत्रीदेखील लोकसभा नको म्हणून नेतृत्वाला चक्क नकार देतात. यामुळेच शेवटी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव- पाटील यांना पक्षात प्रवेश करून अजित पवारांनी उमेदवार निश्चित केला.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसारख्या पक्षांमध्ये कोणताही कार्यकर्ता सहजपणाने लोकसभा निवडणूक लढवायला तयार होतो, असे का, याचे बारकाईने विश्लेषण केल्यास असे दिसते की, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण महाराष्ट्रात कायम कृतीत ठेवले. सत्तेच्या माध्यमातून आमदारांना जवळ ठेवण्यात यश मिळवले आणि आमदारांचे पाहिजे तेवढे लाड पुरविले. त्यांना प्रचंड निधी द्यायचा, ते सांगतील त्या अधिकार्‍यांच्या बदल्या करायच्या, असे सरळ धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. विशेषकरून अजित पवारांनी हे धोरण अधिक कृतीत आणले. तालुक्यात ते आमदार सोडून कुणाचे काहीही ऐकत नाहीत.

हेही वाचा

Back to top button