नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अटक झाल्यानंतर केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना एक संदेश पाठवला आहे. तो त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी व्हिडीओद्वारे प्रसारित केला आहे. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरील चेहरा बदलणार का, यासंदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या.
आमचे नेते केजरीवाल जेलमधून सरकार चालवतील, अशा प्रकारचे वक्तव्य 'आप'चे नेते आणि मंत्री करत आहेत. केजरीवाल यांनी जेलमध्ये असताना जलमंत्रालयासाठी एक आदेशही काढला आहे. मात्र दिल्ली, पंजाबसह अन्य राज्यांमध्ये प्रचार, बैठका, नियोजन अशा विविध कारणांसाठी पर्यायी नेतृत्व लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल खरोखर जेलमधून कारभार करू शकणार का, अटक झाल्यानंतर राजकीय नैतिकता म्हणून मुख्यमंत्रिपदावर राहणे योग्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत.
दिल्लीतील बहुतांश गोष्टींच्या नाड्या या केंद्र सरकारच्या हातात आहेत. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नायब राज्यपालांची ही भूमिका प्रशासकीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची आहे. या सगळ्या परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांना जेलमधून सरकार चालवणे कितपत शक्य होईल, जर त्यांनी सरकार चालवायचे ठरवलेही तरी त्यांच्या मंत्र्यांना सल्लामसलत करण्यासाठी त्यांना नियमित भेटता येईल का, केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही, तर राष्ट्रपती राजवट लागेल का, असे अनेक प्रश्न तयार होतात.
दिल्लीतील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांमध्ये केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचे नाव घेतले जात आहे. त्याला कारण ठरले, त्यांनी केजरीवाल यांचा वाचून दाखवलेला संदेश. केजरीवाल यांच्या पत्नी मुख्यमंत्री, हा एक प्रयोग 'आप'च्या वतीने केला जाऊ शकतो. कारण केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही मंत्र्याकडे किंवा नेत्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे दिल्यास नेत्यांमध्ये अंतर्गत दुफळी माजण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी होणे हे 'आप'साठी फायदेशीर नाही. याउलट केजरीवालांवर अन्याय झाला, हे सांगत प्रचार करणे 'आप'सह मित्रपक्षांना जास्त फायद्याचे राहणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचे सहकारी एकत्रितपणे केजरीवाल यांच्या विषयावरून सहानुभूती मिळवत प्रचार करतील, याची शक्यता जास्त आहे.