‘पुण्यातून सकल मराठा समाजाचा उमेदवार उभा करणार’ | पुढारी

'पुण्यातून सकल मराठा समाजाचा उमेदवार उभा करणार'

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मराठा आरक्षणाची फसवणूक करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याविरोधात मराठा आरक्षणाचे संघर्षयोध्दा मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार उभा करावा, अशी घोषणा केली होती. त्या पार्श्वभुमीवर आज (दि.२६) पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये पुण्यातून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या वतीने खंडोजी बाबा मंदिरामध्ये आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्वती, वारजे, शिवाजीनगर, वडगावशेरी, धनकवडी, कोथरुड, कर्वेनगर, स्वारगेट, कात्रज, बाणेर, पाषाण या भागातील मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मनोग जरांगे यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून ज्या मागण्या आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केल्या. त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून जे मागितले नाही ते दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची बोळवण केली आहे. त्यामुळे सरकारला मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे या बैठकीतून स्पष्ट करण्यात आले.
पुणे लोकसभा मतदार संघामध्ये मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यात येणार असून सर्व मराठा समाजाने संबंधित उमेदवाराच्या पाठिशी पुर्णपणे उभे राहायचे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दि. १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. दि. ३० मार्चपर्यंत इच्छुकांचे अर्ज भरुन घेऊन ते सर्व अर्ज मनोज जरांगे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. मनोज जरांगे हे उमेदवार जाहीर करणार आहेत. दरम्यानच्या काळात प्रत्येक प्रभागामध्ये छोट्या छोट्या बैठका घेऊन मराठा समाजाच्या मतांचाही विचार केला जाणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

वसंत मोरेंची बैठकीला उपस्थिती

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजामधून एक उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुण्यातुन लोकसभेसाठी इच्छुक असलेले वसंत मोरे उपस्थितीत होते. त्यामुळे त्याठिकाणी राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
पुणे लोकसभा मतदार संघासाठी मनोज जरांगे हे जो मराठा उमेदवार देतील. त्या उमेदवाराचा प्रचार आणि पाठिंबा आमच्याकडून कायम राहील. त्या उमदेवाराला विजयी करण्यासाठी सर्वच मराठा बांधव पाठिशी राहतील.
– सचिन आडेकर (समन्वयक, सकल मराठा समाज)
   हेही वाचा :

Back to top button