नणंद – भावजय यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष | पुढारी

नणंद - भावजय यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

सुहास जगताप

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार यावेळी बारामतीच्या ‘होमपिच’वर एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याने यावर्षी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वार्थाने वेगळी होणार आहे. पवारांविरुद्ध उमेदवार शोधण्याची वेळ विरोधी पक्षांवर आजपर्यंत येत होती. परंतु, आता दोन पवारच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच हे घडत असल्याने काय राजकारण रंगते आहे? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत अतिशय चित्तथरारक होणार, हे निश्चित झाले आहे. त्याअनुषंगाने पवारच आपली उणीदुणी कशी काढतात, हे पाहणे रंजक असेल. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील कलगीतुरा कसा रंगतोय? याकडे तमाम जनतेचे लक्ष आहे. सध्या तरी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच सर्व पवार कुटुंब प्रचारासाठी उतरलेले कधीच न पाहिलेले चित्र बारामती मतदारसंघात दिसत आहे.

अजित पवार, त्यांची पत्नी आणि दोन मुले एका बाजूला आणि उरलेले सर्व कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या बाजूला, अशी विभागणी पवार कुटुंबात झाली आहे. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे सुळे यांच्या प्रचारात उतरले आहेत. आमदार रोहित पवार यांच्यासह त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि बहीण सई पवार यासुद्धा सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचारात उतरलेल्या आहेत. पवार कुटुंबच एकमेकांविरुद्ध प्रचार करताना प्रथमच बारामतीकर पाहत आहेत. त्यामुळे अनेकांची अडचणही झालेली आहे. शरद पवार हे बारामतीत व्यापार्‍यांचा मेळावा घेणार होते. परंतु, व्यापार्‍यांनी त्यांना मेळावा घेऊ नका, असे स्पष्टच सांगितले; हा या अडचणीचाच परिणाम आहे.
अजित पवार यांनी 2 जुलैला पक्षात फूट झाल्यापासूनच शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. आजपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून त्याला फारसे उत्तर दिले गेले नव्हते. परंतु, आता सुप्रिया सुळे यांनी आक्रमकपणे अजित पवारांच्या टीकेला उत्तर देण्यास सुरुवात केल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांत दिसू लागले आहे. त्यामुळे जशी निवडणूक पुढे जाईल तसे हे आरोप-
प्रत्यारोपांचे युद्ध चांगलेच रंगणार आहे.

दोन्ही पवारांच्या द़ृष्टीने बारामतीची ही लढत प्रतिष्ठेची आणि राजकीय अस्तित्वाची आहे. अजित पवार आणि शरद पवार हे बारामतीच्या रिंगणात किती काळ गुंतून राहतात, हे पाहणेही मोठे रंजक ठरणार आहे. कारण, हे दोन्ही नेते बारामतीच्या रिंगणातच गुंतून पडले, तर महाराष्ट्रातील त्यांच्या प्रचारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बसू शकतो.
बारामतीच्या या लढतीचे राजकीय चित्र पाहिले, तर मतदारसंघातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे पदाधिकारी आणि गेल्या पंधरा-वीस वर्षांत राजकारणात आलेले हे पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूला आहेत. शरद पवारांनी अजित पवारांच्या गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या कारकिर्दीत बाजूला झालेले नेते एकत्र करून कामाला लावलेले आहेत. त्यामुळे ही लढत तुल्यबळ झालेली आहे. सुरुवातीला सुळे यांना कार्यकर्तेच मिळणार नाहीत, अशी चर्चा होती. तिथून ही लढत आता अतिशय काट्याची होईल इथपर्यंत आलेली आहे.

बारामतीच्या या लढतीला अनेक कंगोरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भाजपचे अतिशय जुने गेल्या 30-35 वर्षांतील कार्यकर्तेनक्की काय करणार, पवारविरोधावरच हे कार्यकर्ते आजपर्यंत तयार झालेले आहेत. आज एकदम अजित पवार यांच्यासाठी काम करणे त्यांना कसे शक्य होईल, हेसुद्धा पाहावे लागेल. गेल्या पंधरा-वीस वर्षांत अजित पवारांच्या कारभाराला तोंड देतच हे कार्यकर्ते लढत आलेले आहेत. त्यामुळे हा एक प्रमुख घटक या निवडणुकीमध्ये असेल. शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली भावना, प्रतिमा यांचाही या लढतीत मोठा वाटा आहे. दोन नेत्यांच्या प्रतिमांचे हे युद्ध असेल. शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती हा एक घटक विचार करण्यासारखा आहे, तर अतिशय तडफेने काम करणारा आक्रमक नेता, अशी अजित पवार यांची प्रतिमा आहे.

शिवतारेंचा इशारा

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आपण अपक्ष लढणार, अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी आता सांगितले असले; तरी घोषणा करताना त्यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय कठोर टीका केल्याने या लढतीला वेगळेच वळण मिळाले आहे.

Back to top button