Narayangaon : शेळ्यांच्या मागात एका घराला तीन बिबट्यांचा वेढा | पुढारी

Narayangaon : शेळ्यांच्या मागात एका घराला तीन बिबट्यांचा वेढा

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगावच्या दरंदाळेमळा येथील धनंजय शिवाजी दरंदाळे यांच्या घराजवळ गुरुवारी (दि. १४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास तीन बिबटे आले होते. यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बिबट्यांनी घराच्या आजूबाजूची पाहणी केली. या घराच्या बाजूला शेळ्यांच्या गोठा असून त्या गोठ्याला तारेचे कंपाउंड असल्याने त्यांना आत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे गोठ्याच्या सगळ्या बाजूने फिरून ते निघून गेले. रात्री कुत्रे का भुंकत होते ? म्हणून त्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज चेक केले असता दहा वाजून सात मिनिटांनी चक्क तीन बिबटे एकत्रितपणे घराजवळ फिरत असलेली आढळून आले. दोन मिनिटे हे तीन बिबटे घराच्या आजूबाजूला फिरले. शिकार न मिळाल्यामुळे ते निघून गेले. बाजूलाच गाई व शेळ्यांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये कुत्रे बांधलेले आहे. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे हे तीनही बिबटे निघून गेले.

दरम्यान धनंजय राजेंद्र दरंदाळे यांच्या घराजवळ एकाच वेळी तीन बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धनंजय दरंदाळे यांच्या घरी भेट दिली असून सीसीटीव्ही फुटेज पाहिले. या ठिकाणी दोन दिवसांमध्ये पिंजरा लावला जाईल, असे धनंजय दरंदळे यांना सांगण्यात आले. साखर कारखान्याची ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आल्यामुळे आणि उन्हाळा कडक असल्यामुळे बिबटे शिकारीसाठी बाहेर पडू लागले असावेत असे वन विभागाचे म्हणणे आहे. धनंजय दरंदळे यांच्या घराजवळ एकाच वेळी तीन बिबटे दिसल्यामुळे संबंधित कुटुंब भयभीत झाले आहे.

हेही वाचा

Back to top button