जेजुरी खंडोबा गडावरील त्रैलोक्य शिवलिंग खुले ! | पुढारी

जेजुरी खंडोबा गडावरील त्रैलोक्य शिवलिंग खुले !

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाशिवरात्रीनिमित्त येथील जेजुरी गडाच्या खंडोबा मंदिरात व शिखरावर असणारे स्वर्गलोकी, भूलोकी व पाताळलोकी (त्रैलोक्य) शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले. या शिवलिंगांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानले जाते. कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते, म्हणून महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे महत्त्व आहे.

जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरातील शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभार्‍यातील मुख्य मंदिराशेजारी असणार्‍या गुप्त मंदिरातील तळघरातील शिवलिंग पाताळलोकी शिवलिंग मानले जाते. मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते, तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. जेजुरी गडावर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामे सुरू असल्याने मंदिराच्या शिखरावरील स्वर्गलोकी शिवलिंग दर्शनासाठी बंद ठेवले होते. त्यामुळे भाविकांनी मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग व तळघरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले.

पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा

महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (दि. 8) मध्यरात्री 12 वाजता शिखरावरील व मंदिराच्या तळघरातील शिवलिंग उघडण्यात आले. पहाटे एक वाजता मानकरी आणि ग्रामस्थांकडून महापूजा व अभिषेक झाल्यानंतर दोन्ही शिवलिंगांचे दर्शन खुले करण्यात आले. दर्शनासाठी पहाटे एक वाजल्यापासून भाविकांनी गडावर रांगा लावल्या होत्या. हार, बेल, पाने, दवणा, फुले यांसह भंडार-खोबरे देवाला अर्पण करण्यात आले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले दर्शन

दुपारी बाराच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे यांनी गडावर खंडोबाची पूजा व अभिषेक केला. जेजुरी देवसंस्थान तसेच भाविकांनी फराळाचे वाटप केले. देवसंस्थानच्या वतीने सुलभ दर्शन, पाणी, स्वच्छता आदी सुविधा पुरविण्यात आल्या ,तर जेजुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी (दि. 9) रात्री बारावाजेपर्यंत जेजुरी गडावरील शिवलिंग दर्शनासाठी खुले राहणार आहे.

हेही वाचा

Back to top button