येत्या पंचवीस वर्षांत शहर कार्बन उत्सर्जनमुक्त : राज्यातील दुसरे शहर | पुढारी

येत्या पंचवीस वर्षांत शहर कार्बन उत्सर्जनमुक्त : राज्यातील दुसरे शहर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी आणि पुणे शहर 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त करण्यासाठी महापालिकेने ‘पुणे क्लायमेट अ‍ॅक्शन प्लान’ तयार केला असून, अशाप्रकारे स्वत:चा आराखडा तयार करणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर ठरले आहे. जागतिक पातळीवर भेडसावणार्‍या हवामान बदलांच्या समस्या सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘हवामान बदल तज्ज्ञ’ समितीने शाश्वत विकासाची उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यानुसार भारतासह शंभरहून देशांनी पुढील 50 वर्षांत कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी राबविण्यात येणार्‍या धोरणांचा अहवाल समितीला सादर केला आहे. केंद्र सरकारने या धर्तीवर देशातील प्रमुख शहरांची ‘रेस टू झिरो’ या योजनेसाठी निवड केली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांचा यात समावेश आहे. निवडलेल्या सर्व शहरांनी ‘क्लायमेट अ‍ॅक्शन प्लान’ तयार करणे अपेक्षित आहे. पुण्याने हा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात कार्बनमुक्त शहर, स्वच्छ पर्यावरण आणि नैसर्गिक संकटांना तोंड देणारी सक्षम यंत्रणा या त्रिसूत्रींचा समावेश आहे. या आराखड्यात वातावरणीय बदलांचे धोके टाळण्यासाठी आवश्यक शाश्वत उद्दिष्टे नमूद करण्यात आली असून, शाश्वत विकासाच्या दिशेने पुण्याला घेऊन जाण्यासाठी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत देश कार्बन उत्सर्जनमुक्त करण्याची घोषणा केली. त्यानुसरून पुणे शहर 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त होण्याचे उद्दिष्ट गाठणार आहे. त्यासाठी ‘पुणे क्लायमेट अ‍ॅक्शन प्लान’ तयार करण्यात आला आहे.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.

असा आहे आराखडा

  • शहरातील इमारतींचे हरित इमारतींमध्ये रूपांतर
  • औद्योगिक परिसरात कार्यक्षम ऊर्जा
  • उपाययोजनांची अंमलबजावणी
  • जल व्यवस्थापनासाठी कार्यक्षम ऊर्जाप्रणाली
  • सर्व इमारतींवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प
  • सौर वॉटर हिटर बसविण्यास प्रोत्साहन
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण
  • ई-वाहनांच्या वापराला प्रोत्साहन व चार्जिंग इन्फ—ास्ट्रक्चर
  • बांधकाम नियमावलीत
  •   ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक
  • सार्वजनिक रेनवॉटर हार्वेस्टिंग
  • जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन प्रकल्प
  • शहरातील हरित आच्छादन वाढविणे
  • विस्तृत भूजल पुनर्भरणाची अंमलबजावणी
  • शाश्वत नदीकाठ विकसन
  • विकेंद्रित कचरा व्यवस्थापन

हेही वाचा

Back to top button