गांधीनगर : गांधीनगरसह परिसरात दिवसागणिक बेकायदा बांधकामांमध्ये कमालीची वाढ होत असून ती रोखणार कोण, असा अनुत्तरीत प्रश्न नागरिकांना सतावत आहे. ग्रामपंचायत, प्राधिकरणचाच या अवैध बांधकामांना आशिर्वाद असल्याची उघड चर्चा आहे. केवळ दाखवण्यापुरती कारवाई होत असल्याची स्थिती आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत तक्रारी जातात. आजअखेर ग्रामपंचायत, प्राधिकरणाने तक्रारीनंतर किती नोटीसा काढल्या, किती पंचनामे केले आणि ठोस कारवाई किती जणांवर केली, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. प्रशासनातील संबंधित घटकांचा या बेकायदा बांधकामाना आशीर्वाद का मिळतो, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी मूग गिळून का गप्प बसतात? याचे स्पष्टीकरण वरिष्ठ कार्यालयाकडून झाले पाहिजे. एखादा सरपंच, बांधकाम सभापती जर बेकायदा बांधकामाना अभय देत असेल तर त्याच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुन्हा दाखल होण्याची तरतूद आहे. कनिष्ठ स्तरही चिडीचूप, वरिष्ठ स्तरही चिडीचूप याचा अर्थ काय घ्यायचा? ओढ्यावर बांधकाम झाल्याच्या तक्रारी झाल्या. नैसर्गिक जलस्रोत चोरीस गेल्यानंतरही प्रशासन ढिम्म आहे, हे लाजिरवाणे आहे. प्रशासनातील वरिष्ठांनी अशा बेकायदा बाबींचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. तसे झाल्यास बेकायदा बांधकामास लगाम बसेल.
सि.स.नं. 1364 वर महेंद्र सुरेशलाल नोतानी, सि.स.नं. 1365 वर रहेंदोमल चोइथानी, सि.स.नं.2165, 2166, 2167, 2168 वर विनोद आवतराय कुकरेजा, सि स.नं.2510 वर वैजयंती सुभाष रजपूत व ब.नं. 168/2 वर प्रेम आंचल पंजवानी यांची बेकायदेशीर बांधकामे गांधीनगरमध्ये राजरोस सुरू आहेत.
गांधीनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी बेकायदा बांधकामे सुरू आहेत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. ग्रामपंचायत बेकायदा बांधकामाना पाठीशी घालणार नाही. – संदीप पाटोळे, सरपंच, गांधीनगर