Maharashtra MSME Defense Expo : रणगाडे, तोफांबरोबर सेल्फीसाठी गर्दी | पुढारी

Maharashtra MSME Defense Expo : रणगाडे, तोफांबरोबर सेल्फीसाठी गर्दी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून मोशी येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोला रविवारी (दि. 25) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनासाठी 1 लाख 26 हजार 387 नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 2 हजार 238 नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून नागरिकांनी कुटुंबीयांसह प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. देशाच्या संरक्षण सामग्रीची माहिती देणारी दालने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

दरम्यान, आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी 62 हजार 875 नागरिकांनीच प्रदर्शन पाहण्यासाठी नोंदणी केली होती. त्यातील 19 हजार 161 नागरिकांनीच प्रदर्शनास भेट दिली. तुलनेत रविवारी दुप्पट नोंदणी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. इंटरनॅशनल एक्झिबिशन अ‍ॅण्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या प्रदर्शनात रणगाडे, हेलिकॉप्टर, तोफा, क्षेपणास्त्रे व अन्य शस्त्रसामग्री प्रदर्शनात पाहण्याची व्यवस्था केलेली आहे.

संरक्षण दलातील अधिकार्‍यांशी संवाद

प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी दररोज एक याप्रमाणे तिन्ही भारतीय सैन्यदलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ भेट देत आहेत. त्यांच्या भेटी आणि संवादामुळे विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक भारावून गेले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, हवाई दलप्रमुख व्ही. आर. चौधरी, सैन्यदल प्रमुख मनोज पांडे, नौसेना प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांची उपस्थिती सर्वांना प्रेरणा देऊन जात आहे.

शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्साह

प्रदर्शनामध्ये विविध रणगाडे, तोफा यांच्याजवळ थांबून सेल्फी काढण्यावर अनेकांचा भर होता. कुटुंबासह आलेले नागरिक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी हे फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसत होते.

प्रदर्शनाला जत्रेचे स्वरूप

डिफेन्स एक्स्पोला रविवारी जणू जत्रेचे स्वरुप आले होते. विविध दालनांमध्ये तुडूंब गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे, येथे लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही खवय्यांची गर्दी पाहण्यास मिळाली.

हेही वाचा

Back to top button