पुणेकरांच्या विमान प्रवासाची विक्रमी भरारी! | पुढारी

पुणेकरांच्या विमान प्रवासाची विक्रमी भरारी!

प्रसाद जगताप

पुणे : विमानतळावरील विमानोड्डाणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, सन 2022-23 या वर्षातील विमानोड्डाणांनी गेल्या चार वर्षांतील उड्डाणांचे ’रेकॉर्ड ब्रेक’ केल्याचे समोर आले आहे. यंदा सर्वाधिक 59 हजार 451 उड्डाणांची नोंद झालेली आहे. पुण्याचे महत्त्व जगभरात वाढत आहे. त्यामुळे पुण्यात हवाई मार्गाने ये-जा करणार्‍यांची संख्या वाढत आहेत. व्यापार, कार्यालयीन कामे, पर्यटन, नोकरीच्या निमित्ताने अनेकजण पुण्यातून जगभरात प्रवास करतात. त्यामुळे गेल्या चार वर्षांत प्रवासी संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून 59 हजार 451 विमानांची उड्डाणे झाली आहेत.

यामुळे गेल्या चार वर्षांतील पुणे विमानतळावरील उड्डाणांचे 2022-23 या आर्थिक वर्षात रेकॉर्ड ब्रेक झाले असून, सर्वाधिक विमानोड्डाणांची नोंद करण्यात आली आहे. 2023-24 या वर्षातदेखील पुणे विमानतळावरील विमानोड्डाणांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, यंदाही येथील उड्डाणांचे नवे रेकॉर्ड तयार होण्याची शक्यता आहे.

दिवसाला 190 विमानांच्या फेर्‍या

पुणे विमानतळावरून होणार्‍या विमानउड्डाणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूर्वी 130 ते 140 च्या घरात दिवसाला येथून विमानांची उड्डाणे होत होती. मात्र, सन 2023-24 या कालावधीत यामध्ये चांगलीच वाढ झाली असून, आता दिवसाला सुमारे 180 ते 190 च्या घरात विमानांची उड्डाणे होत आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे विकेंडला प्रवास करणार्‍यांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक असते.

धावपट्ट्यांमध्ये वाढ करण्याची गरज

पुणे विमानतळावरील उड्डाणे वाढवण्याची आणि पुणेकर प्रवाशांची क्षमता आता ’फुल्ल’ झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने येथेच लागून नवीन टर्मिनल उभारले आहे. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिलासा मिळणार आहे. परंतु येथील धावपट्टीसाठी प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे आता धावपट्टी वाढविण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असून, किमान येथील धावपट्टी 1 किलोमीटरने वाढवावी लागणार आहे. त्यासाठी 135 एकर जागा खरेदी करावी लागणार आहे. त्याकरिता आवश्यक निधीसाठी राज्य सरकार, दोन्ही महापालिका, पीएमआरडीए यांनी योगदान देणे गरजेचे आहे.

हेही वाचा

Back to top button