चाकण बनतेय ‘मिसाईल’ हब : लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार होणार | पुढारी

चाकण बनतेय ‘मिसाईल’ हब : लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय संरक्षण दलासाठी लागणारी सर्वप्रकारची यंत्रसामग्री एकाच छताखाली चाकणमध्ये तयार होणार आहे. यात प्रामुख्याने मिसाईल व लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार होतील. 80 कोटी रुपयांची गुंतवणूक करून निबे लि. कंपनीने हे आव्हान स्वीकारले आहे. निबे कंपनीने चाकणमध्ये 80 कोटींची गुंतवणूक करत संरक्षण दलासाठी लागणार्‍या तीन भव्य शेडच्या विस्तारित कामाचे उद्घाटन शिवजयंतीच्या मुहूर्तावर केले. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट, नौदलप्रमुख आर. हरिकुमार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी या तीन पाहुण्यांच्या हस्ते कंपनीच्या विस्तारित कामाचे उद्घाटन झाले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे म्हणाले, आम्ही लष्कर, नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांना लागणारी यंत्रसामग्री तयार करणार आहोत. यात लढाऊ विमानांचे सुटे भाग, मिसाईल लाँचर, बंदुकीसह लष्करासाठी लागणारे अद्ययावत ट्रकही या कंपनीतून तयार केले जात आहेत.

संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांना लागणार्‍या यंत्रसामग्रीचे एकत्रित उत्पादन करणारा देशातील मोठा प्रकल्प आम्ही चाकण येथे उभा केला आहे. येथून पिनाका मिसाईलचे सुटे भागही आम्ही तयार करून देणार आहोत.

– गणेश निबे, व्यवस्थापकीय संचालक, निबे लि., चाकण

हेही वाचा

Back to top button