सरकारी काम अन् सहा महिने थांब; ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांची प्रतीक्षा | पुढारी

सरकारी काम अन् सहा महिने थांब; ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांची प्रतीक्षा

संतोष निंबाळकर

धानोरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतर्फे शिक्षकदिनी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविले जाते. परंतु, या शैक्षणिक वर्षातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांची अंतिम यादी तयार असूनही अद्याप या पुरस्कारांचे वितरण झाले नाही. ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या उक्तीचा प्रत्याय आता महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांनाही येत आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका व खासगी शाळांमधील अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य व देशपातळीवर विविध क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन करतात. त्यांना घडविणार्‍या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक प्राथमिक विभागातील शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिले जातात.

या वर्षी या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार व टॅब देण्यात येणार असल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप पुरस्कार सोहळाच न झाल्याने पुरस्कारही नाही आणि टॅबही नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वास्ताविक, 5 सप्टेंबर 2023 रोजी (शिक्षकदिनी) या पुरस्कारांचे वितरण होणे आवश्यक होते. परंतु, ते अद्यापही झाले नाही. याबाबत सहायक प्रशासकीय अधिकारी महादेव जाधव म्हणाले, ‘पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची अंतिम यादी तयार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये अतिरिक्त आयुक्तांकडे ही यादी दिलेली आहे.’ अधिक माहितीसाठी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.

अशी होते पुरस्कारार्थींची निवड…

  1. महापालिका शिक्षण विभागाकडून पाठविण्यात आलेल्या ऑनलाइन लिंकमध्ये पात्र शिक्षक आपली माहिती भरून देतात.
  2. जिल्हा, राज्यपातळीवर किती विद्यार्थी शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा, क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झाले, पटसंख्यावाढ, विद्यार्थ्यांची हजेरी आदी गोष्टींचा विचार करून शिक्षकांना गुण दिले जातात.
  3. गुणदानतक्त्यानुसार 1:3 शिक्षकांची कागदपत्र छाननी आणि मुलाखत होऊन अंतिम यादी तयार केली जाते.
  4. महापालिका प्राथमिक शाळेतील दहा व खासगी शाळांतील पाच, अशा एकूण पंधरा शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिला जातो.

शिक्षकांकडून अनेक शैक्षणिक तसेच अशैक्षणिक कामे करून घेतली जातात. मात्र, आदर्श शिक्षकांचा गुणगौरव वेळेवर होत नाही. पाठपुरावा करूनही पुरस्कार वितरण होत नसल्याने गुणवान शिक्षकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत आहे.

– नितीन वाणी, अध्यक्ष, पुणे शहर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

विद्यार्थी घडविणार्‍या शिक्षकांचे कौतुक झालेच पाहिजे. पण, सध्या महापालिकेला शिक्षक दिनाचा विसर पडला आहे. याबाबत पात्र देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. तातडीने निर्णय न झाल्यास येत्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुरस्कार वितरण केले जाईल.

-दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँगेस

हेही वाचा

Back to top button