नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा | पुढारी

नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेवरून भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच भाजपच्या पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकची जागा भाजपला सोडावी, असे पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख केदा आहेर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. नाशिकच्या जागेसाठी भाजपच्या कोअर कमिटीने थेट दिल्लीपर्यंत धाव घेतल्याने आता शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक आता अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. फेब्रुवारीअखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान बनल्या आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ प्लस जागा महायुती जिंकेल, असा दावा भाजपने केला आहे. किंबहुना त्या दिशेने महायुतीची निवडणूक तयारी सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तसेच शिवसेना (ठाकरे गट) महाआघाडीनेदेखील व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाशिक मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटात असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारीवर शिंदे गटाने दावा सांगितला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप जोरात आहे. फाटाफुटीमुळे विरोधकांची ताकद कमी झाल्याचा फायदा उचलण्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. भाजपने उत्तर प्रदेशचा पॅटर्न महाराष्ट्रातही वापरण्यास सुरुवात केली असून, अयोध्या, वाराणसीच्या धर्तीवर महाराष्ट्रात नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. नाशिकची जागा शिंदे गटाकडून खेचून घेण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे स्थानिक आमदार, पक्ष पदाधिकारी सक्रिय झाले असून, त्यांनी पक्षनेतृत्वाला पत्र पाठवत नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे.

मित्रपक्षाच्या खासदार आपल्याच पाठिंब्यामुळे…
नाशिक लोकसभा मतदारसंघातील पक्षाची राजकीय ताकद बघता सदरचा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आपल्या पक्षाच्या पाठबळामुळेच मित्रपक्षाचे खासदार भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी तीन विधानसभा क्षेत्रांत आपल्या पक्षाचे आमदार आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारास भाजपमुळे प्रचंड मताधिक्य मिळालेले होते. नाशिक महापालिकेत व त्र्यंबक नगरपालिकेत आपल्या पक्षाचे प्राबल्य असून, सर्वाधिक नगरसेवक आपल्या पक्षाचे आहेत. दोन्ही ठिकाणी एकहाती सत्ता ही आपल्या पक्षाची आहे. आज आपले पक्षसंघटन या लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रांत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे यावा, अशी भावना प्रत्येक पक्ष कार्यकर्त्याची व नेत्यांची आहे. त्याचबरोबर जनसामान्यांचेही मनात भाजपचा खासदार येथून व्हावा, ही भावना सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची असल्याने या ठिकाणी भाजपला उमेदवार द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

यांनी केली पत्राद्वारे मागणी
पत्रावर नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख केदा आहेर, नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर यांच्यासह नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सुनील बच्छाव, जिल्हाध्यक्ष(उत्तर) शंकर वाघ, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठे नेते विजय साने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटनात्मक तसेच लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने प्राबल्य आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा उमेदवार असावा, अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. याबाबत पक्षाच्या नेत्यांकडे मागणी करण्यात आली आहे. – केदा आहेर, नाशिक लोकसभा प्रमुख.

हेही वाचा:

Back to top button