निमगाव खंडोबा मंदिरात येण्या-जाण्यासाठी लिफ्टची सुविधा | पुढारी

निमगाव खंडोबा मंदिरात येण्या-जाण्यासाठी लिफ्टची सुविधा

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : निमगाव (ता. खेड) येथील कुलदैवत श्रीखंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी लिफ्टची सुविधा करण्यात येणार आहे. याशिवाय इतर सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली. निमगावच्या खंडोबा मंदिर परिसरात सोयीसुविधा निर्माण कराव्यात तसेच यासाठी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

या विषयाला अनुसरून मंगळवारी (दि. 13) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक झाली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, निमगाव येथील श्रीखंडोबा मंदिर उंचावर असल्याने या ठिकाणी भाविकांना विनासायास जाण्या-येण्याच्या दृष्टीने आमदार मोहिते-पाटील यांनी रोप वेची मागणी केली होती. त्या ठिकाणी रोप वे उभारणी करता येत नसल्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून लिफ्ट उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्रीय राखीव निधीमधून पैसे देण्यात येणार आहेत. काही सोयीसुविधांसाठी शासकीय जागेची आवश्यकता आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेला नि:शुल्क जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

श्रीखंडोबा मंदिर परिसरात छत्रपती श्रीशिवाजी महाराज स्मारक, भक्त निवास, अ‍ॅम्पी थिएटर, बगीचा, पार्किंग, कार्यालय, प्रसादालय, स्वच्छतागृहे, स्कायवॉक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. लिफ्टमधून दिव्यांग, वृद्ध, महिला, बालके यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एकावेळी 26 जणांना लिफ्टमधून जाता-येता येणार आहे. केंद्रीय आर्थिक विकास निधीतून तरतूद करावी, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहायक संकेत भोंडवे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
                                                                       – दिलीप मोहिते-पाटील, आमदार.

 

Back to top button