रखडलेल्या कामांचा सामान्यांना फटका | पुढारी

रखडलेल्या कामांचा सामान्यांना फटका

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  बिबवेवाडी परिसरातील अप्पर डेपो, पासलकर चौक, राजीव गांधीनगर कामगार पुतळा चौक, डॉल्फिन चौक, संविधान चौक, चिंतामणीनगर इ. भागात गेल्या चार महिन्यांपासून विविध रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत. अप्पर इंदिरानगर चौक ते अप्पर डेपोपर्यंतच्या भागात रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे. या रखडलेल्या कामाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या कामांसाठी वेगवेगळे ठेकेदार असल्यामुळे कामांमध्ये दिरंगाई मोठ्या प्रमाणात होत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समन्वयाच्या अभावामुळे रस्ते खोदून बरेच दिवस तसेच ठेवलेले आहेत. परिणामी, या भागातून वाहनचालक पादचारी व सर्वसामान्य नागरिकांना एक किलोमीटर रस्त्यासाठी सायंकाळी एक तास वेळ लागतो.

याचा फटका स्थानिक रहिवाशी, व्यापारी, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. महापालिका प्रशासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे. अप्पर डेपो, चैत्रबन, सुखसागर नगर व पासलकर चौक इत्यादी भागांतून अवजड वाहने बेसुमार वेगाने धावतात. त्यातच पीएमपीएलच्या बसेस रस्त्याच्या मध्ये बंद पडलेल्या असतात.

महापालिकेने विकासकामे करत असताना पर्यायी रस्ता व नागरिकांच्या हिताच्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या शाळांच्या परीक्षांचे दिवस आहेत. सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वाहतूक पोलिसांची तर वानवाच आहे. पासलकर चौक ते संविधान चौकापर्यंत कधी वाहतूक पोलिस दिसून येत नाही. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.
                                    – कुमार ठोंबरे पाटील, नागरिक,अप्पर बिबवेवाडी.

अप्पर डेपो परिसरातील रस्ता दुरुस्तीचे व सिमेंट काँक्रिटीकरणचे काम चालू आहे. पुढील दोन महिन्यांत संपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याचा महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेणार आहे.
                   – अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथविभाग, पुणे महापालिका, पुणे.

 

Back to top button