सावधान..! एटीएमच्या बाहेर फिरताहेत चोरटे | पुढारी

सावधान..! एटीएमच्या बाहेर फिरताहेत चोरटे

संतोष शिंदे

पिंपरी : तुम्ही जर एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी जात असाल, तर एटीएम सेंटरमध्ये किंवा बाहेर असलेल्या संशयित व्यक्तीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवा. कारण मागील काही दिवसांपासून मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने एटीएम कार्ड पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड पळवून नेल्याच्या काही घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. हातचलाखीने एटीएम कार्ड पळवल्यानंतर चोरट्यांनी काही अंतरावर एटीएम कार्ड स्वाईप मारून खरेदी केली आहे. ज्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड बसला आहे. या घटनेनंतर संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा सापडला नसल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागात हे प्रकार समोर येत असल्याने यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे संशय व्यक्त होत आहे.

एकट्या महिला, वृद्ध टार्गेट

या मोडस ऑपरेंडीमध्ये वृद्ध किंवा एकट्या महिलेला टार्गेट केल्या जातात. एकट्या महिला आणि वृद्ध भूलथापांना इतरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग

एटीएम सेंटरमध्ये आलेल्या चोरटा हात चलाखीने कार्डची अफरातफर करतो. त्या वेळी एटीएम सेंटर बाहेर त्याचे साथीदार रेकी करत असतात. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कार्ड स्वाईप करून खरेदी करण्याची जबाबदारी दुसर्‍या साथीदारांकडे सोपवली जाते. त्यामुळे खरेदी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍या चोरट्याला तक्रारदार ओळखत नाहीत. मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी सुरेश वसंतराव सूर्यवंशी (61, रा. वाल्हेकरवाडी) या वृद्धाचे एटीएम कार्ड पळवून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 8) सकाळी पावणेअकरा ते बाराच्या कालावधीत चिंचवड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात घडली. एटीएम पळवल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यावरील 40 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. सूर्यवंशी यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

…अशी आहे मोडस ऑपरेंडी

प्रतिकार करू न शकणारे, तसेच साधेपणा असलेले सावज चोरट्यांकडून हेरले जाते. त्यांच्या सोबत कोणीही नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर एटीएम मशीनमधून संबंधित नागरिक पैसे काढत असताना चोरटे आत जातात. मशीनमध्ये तांत्रिक अडचण असून पैसे अडकून राहत असल्याचे खोटे सांगितले जाते. यासह परिस्थितीनुसार वेगवेगळी कारणे दिली जातात. त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने चोरटे एटीएम कार्डची अदलाबदल करतात. त्या वेळी पिन टाकण्यास सांगितले जाते.

त्यानंतर काही कळण्याच्या आत चोरटे तेथून पोबारा करतात. आपल्या हातात असलेले एटीएम कार्ड भलतेच असल्याचे नागरिकांच्या लवकर लक्षात येत नाही. पैसे निघत नसल्याचे पाहून नागरिक घरी जातात. तोपर्यंत आपले एटीएम कार्ड स्वाईप करून इतरत्र ठिकाणी खरेदी केल्याचे मेसेज मोबाईलवर येऊन धडकू लागतात. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला असतो.

हे करा…

  • पैसे काढत असताना एटीएम सेंटरचे दार पूर्णपणे बंद ठेवा
  •  गोपनीय पिन टाकत असताना बाहेरून कोणी पाहत नाही ना, याची खात्री करा
  •  पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तींना एटीएम सेंटरमध्ये प्रवेश देऊ नका
  •  संशयित हालचाली वाटल्यास पोलिस नियत्रंण कक्षाची (112) मदत घ्या
  •  मशीनमधून पैसे येण्यास तांत्रिक अडचण येत असल्यास व्यवहार थांबवा
  •  अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नका.
  •  बँक खात्याबाबत कोणीतीही माहिती शेअर करू नका.
  •  चोरटे कोणत्याही वेशात येऊ शकतात. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका

‘बर्किंग’ एक मोठी समस्या

गुन्हे आटोक्यात असल्याचे भासवण्यासाठी ठाण्यातील अधिकार्‍यांकडून ‘बर्किंग’ म्हणजेच गुन्हे दाखल न करण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. नुकतेच वाकड येथे एका महिलेच्या हातातील एटीएम कार्ड चोरट्याने फसवणूक करून पळवून नेले. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या एका अधिकार्‍याने महिलेसोबत आलेल्या तिच्या दीराला याबाबत गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले. तसेच, हे प्रकरण सायबर विभागाच्या अंतर्गत येत असल्याचे सांगून अर्ज घेत, त्यांची बोळवण केली. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या कार्डवरून दोन ठिकाणी पैसे काढले. बँकेला सांगून कार्ड बंद केल्यामुळे चोरट्याने केलेला तिसरा प्रयत्न फसला. पोलिस दाद देत नसल्याने संबंधित तक्रारदारांनी माध्यमांशी संपर्क साधला. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घातल्यानंतर दोन दिवसांनी महिलेचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button