चार हजार शाळांना व्हायचंय ‘सुंदर शाळा’ | पुढारी

चार हजार शाळांना व्हायचंय ‘सुंदर शाळा’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेला पुण्यात सुमारे चार हजार शाळांनी पोर्टलवर माहिती अपडेट केली. यात सर्वाधिक जिल्हा परिषदेच्या सुमारे 2400 शाळांनी माहिती भरून पुढाकार घेतला आहे. तर दीड हजारापर्यंतच्या शाळांची माहिती अद्याप प्रलंबित असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली. या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरलमधील शाळा पोर्टलद्वारे टॅब उपलब्ध करून देऊन माहिती भरण्यात येत आहे. शाळांना माहिती भरून देण्यात येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हा उपक्रम 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानातून स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे हा त्यामागे हेतू आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानात त्रिस्तरीय स्पर्धा

जिल्हा परिषद, महापालिकांच्या शाळांमधून वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची नोंद या स्पर्धेद्वारे घेण्यात येणार आहे. त्यात शाळा परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता संदर्भातील उपक्रम, खेळ, या संदर्भातील कार्यक्रम राबविल्यास त्याचे छायाचित्रे, व्हिडिओ हे पोर्टलवर ऑनलाइनद्वारे अपलोड करावे लागेल. तालुका, जिल्हास्तर तसेच विभागीय स्तरावर अशा स्पर्धा असणार आहे. त्यानंतर राज्यस्तर असे बक्षिसे देण्यात येणार आहेत.

हेही वाचा

Back to top button