यंदाही ड्रेनेज सफाईच्या निविदा कमी दराने; काम व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह | पुढारी

यंदाही ड्रेनेज सफाईच्या निविदा कमी दराने; काम व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मलनिस्सारण (ड्रेनेज) लाईन व नाले सफाईच्या निविदा कमी दराने येण्याची परंपरा प्रशासकाच्या कारकिर्दीमध्येही सुरूच आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही याबाबतच्या निविदा सरासरी 4 टक्के कमी दराने आल्या असून, त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही कामे होणार का आणि झाली तर त्याचा दर्जा राखला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे या निविदा प्रक्रियेमध्ये रिंग झाल्याचेही बोलले जात आहे.

महापालिका शहराच्या विविध भागात ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे करतात. मास्टर प्लॉननुसार नाना पेठ, फिश मार्कट, अरुणा चौक, इनामदार चौक, वडगाव पूल ते पावूनजाई मंदिर येथे अपुर्‍या क्षमतेच्या मलवाहिन्या बदलणे आणि आवश्यक क्षमतेच्या मोठ्या व्यासाच्या मलवाहिन्या विकसित करणे, यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. त्यातील एक निविदा 4 टक्के कमी आणि दुसरी निविदा 33 टक्के कमी दराची आहे. कृष्णानगर महमंदवाडी स्मशान भूमी समोरील नाल्याच्याकडेने सीमाभिंत बांधणे यासाठीची निविदा 4 टक्के कमी दराने आली आहेत. नाला कल्व्हर्ट आणि मलवाहिन्यावर आरसीसी चेंबर बदलून गेट बसविण्याची निविदा 4 टक्के कमी दराने आली आहे.

राजेवाडी परिसर, कसबा मतदारसंघातील अमजादखान चौक ते रांका ज्वेलर्स महाराणा प्रताप रस्ता मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकणे, बी.टी. कवडे परिसरात ड्रेनेजचे काम करणे, आईमाता मंदिर परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे या सर्व कामांच्या निविदा 4 टक्के कमी दरानेच आल्या आहेत. लोहगावातील मलनिस्सारणाची लाईनची साफसफाई करण्याची निविदा 11 टक्के कमी दारानी आली आहेत. विशेष म्हणजे या सर्व निविदा स्थायी समितीमध्ये दाखल करून मान्य करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी सर्व भागातील निविदा कशा काय मान्यतेला आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रिंग झाल्याची शक्यता

आथिक वर्ष संपत असतानाच ड्रेनेज विषयक निविदा काढण्यात आल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामधील काही निविदा 30 टक्यांपेक्षा कमी दराने आल्या आहेत. तर काही निविदा 4 टक्क्यांपेक्षा कमी दराने आल्या आहेत. 4 टक्के आणि 30 टक्के यांचा ट्रेंड सुद्धा कोठेच जुळत नाही. त्यामुळे रिंग करून निविदांचे वाटप झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

Back to top button