गोंदिया: नवरगावचे सरपंच, उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव मंजूर | पुढारी

गोंदिया: नवरगावचे सरपंच, उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव मंजूर

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : तिरोडा तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांवर एकाच दिवशी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे या निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच यांना एकाच वेळी पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन २०२१ मध्ये झाली. ज्यामध्ये सात सदस्य सियानंद मूलचंद ठाकरे, सुखदेव गंगाराम चाचणे, भाग्यश्री मुकेश पटले, रेखा हरलाल पटले, सरला सुखदास कोकुडे, प्रकाश काशीराम ठाकरे, भूमेश्वरी चंद्रशेखर कटरे विजयी झाले. यावेळी सरपंचपदी प्रकाश ठाकरे यांची तर उपसरपंचपदी भुमेश्वरी चंद्रशेखर कटरे यांची निवड करण्यात आली. मात्र, सरपंच व उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे आरोप करत तसे पत्र उर्वरित पाच सदस्य सियानंद ठाकरे, सुखदेव चाचणे, भाग्यश्री पटले, रेखा पटले, सरला कोकुडे यांनी तिरोडाचे तहसीलदार यांना दिले. यापुढे आमचा सरपंच व उपसरपंचावर विश्वास नसल्याचे पत्रात नमूद केले.

या पत्राच्या आधारे 5 फेब्रुवारी 2024 रोजी तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी गजानन कोकुडे, पटवारी आनंद भुते, ग्रामपंचायत सचिव डी.एच. वाघमारे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत पाच सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने, तर दोन सदस्यांनी विरोधात मतदान केले. यात सरपंच व उपसरपंच दोघांवर 2 विरुद्ध 5 मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. तेव्हा या निर्णयामुळे विद्यमान सरपंच व उपसरपंच यांना पदावरून हटवले जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा 

Back to top button