Market Update : मध्य प्रदेशातील बटाटा खातोय भाव | पुढारी

Market Update : मध्य प्रदेशातील बटाटा खातोय भाव

शंकर कवडे

पुणे : मध्य प्रदेशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये बटाट्याचे दर वाढल्याने त्याचा परिणाम पुण्याच्या बाजारपेठेवर झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील बटाटा विभागात रविवारी 20 ते 25 ट्रकमधून बटाटा विक्रीसाठी दाखल झाला. गत आठवड्याच्या तुलनेत ही आवक निम्मी राहिली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने बटाट्याच्या भावत किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली. परराज्यातील बटाट्याच्या किलोला 18 ते 20 रुपये तर स्थानिक भागातील बटाट्याला
15 ते 18 रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात 30 ते 35 रुपये किलो दराने बटाट्याची विक्री सुरू होती.

लहरी वातावरणाचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर होत झाल्याने रविवारी बाजारात फळभाज्यांची आवक 10 ते 15 ट्रकने घटली. राज्यासह परराज्यातून 80 ते 90 ट्रक शेतमाल बाजारात विक्रीसाठी दाखल झाला. मार्केट यार्डात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने फ्लॉवर व शेवग्याच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील जेष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक व गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 8 ते 10 टेम्पो, कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, आंध्रप्रदेश व तमिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 11 ते 12 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून पावटा 3 ते 4 टेम्पो, 2 टेम्पो भुईमूग, राजस्थान येथून 10 ते 12 ट्रक मटार, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 14 ते 15 टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 11 ते 12 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 10 ते 12 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 14 ते 15 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक, इंदूर व स्थानिक भागातून बटाटा 20 ते 25 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

पालेभाज्यांतील स्वस्ताई टिकून
मार्केट यार्डातील तरकारी विभागात बहुतांश पालेभाज्यांची आवक-जावक कायम आहे. परिणामी, सर्व पालेभाज्यांमधील आलेली स्वस्ताई टिकून असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. रविवारी कोथिंबिरीची सव्वा लाख जुडी, तर मेथीची 70 ते 80 हजार जुडी तर हरभरागड्डीची 10 ते 15 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीसह मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात एका जुडीची 3 ते 10 रुपये, तर किरकोळ बाजारात 8 ते 20 रुपये दराने गड्डीची विक्री सुरू होती.

Back to top button