पुण्यातून बांबूची वर्षाला 60 लाखांची उलाढाल.. | पुढारी

पुण्यातून बांबूची वर्षाला 60 लाखांची उलाढाल..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील वेल्हा, भोर आणि मुळशी या तीन तालुक्यांतील शेतकर्‍यांनी बांबू उत्पादनात क्रांती केली असून, शेताच्या बांधावर सात वर्षांपूर्वी लावलेला बांबू सातासमुद्रापार गेला आहे. या तीन तालुक्यांतून वर्षाला 20 हजार ट्रक बांबू शेतकरी विक्रीसाठी पाठवत असून, त्यातून 60 लाख रुपयांची उलाढाल होत आहेत.

सात वर्षांपूर्वी या तीन तालुक्यांतील शेतकर्‍यांनी बांबू उत्पादनाचा ध्यास घेतला.काही शेतकर्‍यांनी वैयक्तिक, तर काहींनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करीत ही लागवड केली.आता चक्क रेल्वेने पुण्यातून दरवर्षी 60 लाख रुपयांचा बांबू दक्षिण भारतात विकला जात आहे.आजवर यातील काही शेतकर्‍यांनी तयार केलेल्या बांबूच्या वस्तू सातासमुद्रापार गेल्या आहेत.

बांबूने दिला नवा व्यवसाय

सात वर्षांपूर्वी या तीन तालुक्यांतील शेतकर्‍यांनी शेतातील फक्त बांधावर बांबू लावण्यास सुरुवात केली. आज या भागात बांबूचे घटदाट जंगल पाहावयास मिळते. 2016 ते 2019 या तीन वर्षांत त्यांनी अथक मेहनत घेतली आणि दक्षिण भारतासारखे बांबूचे घनदाट जंगल बहरले. बांबूला केवळ देशात नव्हे तर विदेशातून मागणी येत आहे. यात संपूर्ण 32 फूट उंचीचा बांबू ते त्यापासून तयार केलेल्या विविध उत्पादनांचा समावेश आहे.

एका ट्रकमध्ये सुमारे एक ते दीड हजार बांबूंच्या काड्या जातात. वर्षभरात या तीन तालुक्यांतून 20 हजार ट्रक दक्षिण भारतात विकला जातो. तो माल आम्ही रेल्वेने पाठवतो. सात वर्षांपूर्वी घेतलेली मेहनत आता कामी येत आहे. याला जास्त पाणी लागत नाही. पावसाळ्यात शेताच्या बांधावर किंवा डोंगराच्या उतारावर ही शेती केली जाते.

– अशोक सातपुते, बांबू उत्पादक शेतकरी, मुळशी

या आहेत बांबूच्या प्रजाती

बांबूची लांबी 40 फुटांपर्यंत जाते. पण शेंडा कापून 32 फुटांपर्यंतचा बांबू विकला जातो. उरलेल्या भागापासून शेतकरी विविध प्रकारचे फर्निचर शोभेच्या वस्तूही बनवतात.वेल्हा येथे बांबू प्रोसेसिंग युनिट आहे. बांबूवर प्रक्रिया करून वस्तू बनवल्या जातात. मेस, मगणा, ढोपीन, हुडा, तांदुळ मेस, मानवेल, खटांग (काटेरी कळक) या बांबूच्या प्रजातींची लागवड या तीन तालुक्यांत होते.

बांबू कांदाचाळीसाठी उत्तम

या शेतकर्‍यांनी बांबूपासून केवळ फर्निचरच नव्हे तर कांदा उत्पादकांसाठी अभिनव पध्दतीची कांदाचाळ उभारली आहे.पहिला प्रयोग नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे सर्वात मोठी कांदाचाळ त्यांनी तयार करून दिली त्यात 600 टन कांदा जतन करून ठेवता आला.

हेही वाचा

Back to top button