आळंदी स्फोट : तिघांवर ससूनमध्ये उपचार; कंपनी मालकावर गुन्हा दाखल | पुढारी

आळंदी स्फोट : तिघांवर ससूनमध्ये उपचार; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आळंदीजवळील सोळू गावातील दुर्घटनेत जखमी झालेल्या सात रुग्णांना गुरुवारी रात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सातपैकी एका रुग्णाचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. दोन रुग्ण 95-100 टक्के भाजल्याने त्यांचाही मृत्यू झाला. एका रुग्णाला डामा डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये शावला प्रसाद (वय 28, 80-85 टक्के जळीत), अब्दुल खान (वय 36, 70-80 टक्के जळीत) आणि बसवराज बनसोडे (वय 50, 60-65 टक्के जळीत) यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांनी दिली.

रुग्णांचा कार्बोक्सि हिमोग्लोबिन स्तर वाढलेला असून, ऑक्सि हिमोग्लोबिन स्तर कमी झाला आहे. त्यांच्यावर स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार, प्लास्टिक सर्जरी विभागामध्ये डॉ. पराग सहस्रबुद्धे, डॉ. निखिल पानसे आणि सहकारी डॉक्टरांच्या टीमद्वारे उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी दिली. मृत रुग्णांमध्ये रामचंद्र निंबाळकर (वय 81) यांचा समावेश असून दुसर्‍या मृत रुग्णाची ओळख शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पटू शकली नव्हती.

आळंदीजवळ असलेल्या सोळू गावात अ‍ॅल्युमिनियम प्लेट बनवणार्‍या कंपनीत भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून 19 जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
नरेंद्र मोहनलाल सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे), फनेंद्र हरकचंद मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोळू ते खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रा. लि. ही कंपनी आहे. ही कंपनी मागील चार वर्षांपासून बंद आहे. कंपनी बंद असताना देखील कंपनीमध्ये अ‍ॅल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनविण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल कंपनीत साठवून ठेवण्यात आला होता. त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. गुरुवारी सायंकाळी या कच्चा मालाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. यात सुरुवातीला दोघांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. घटनेत घरांचे, वाहनांचे आणि दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button