शिर्सुफळ तलावातील पाणी उपसा थांबवा | पुढारी

शिर्सुफळ तलावातील पाणी उपसा थांबवा

शिर्सुफळ : पुढारी वृत्तसेवा :  शिर्सुफळ (ता. बारामती) येथील तलावामध्ये सध्या 60 एमसीएफटी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा देखील आम्हाला कमी पडतो. भविष्यात दुष्काळाचे सावट असल्याने हा पाणीसाठा स्थानिकांच्या जनावरांसाठी तसेच पिण्यासाठी ठेवण्यात यावा. शिरसाई योजनेद्वारे पुढील गावांसाठी सोडण्यात येणारे पाणी थांबवावे. या वेळी जलसंपदाला पोलिस बंदोबस्त देऊ नये; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन पोलिस प्रशासनाला ग्रामस्थांनी दिले आहे. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब झगडे, दीपक आटोळे, राजेंद्र आटोळे, महादेव म्हेत्रे, महादेव आटोळे, दत्तात्रय ठोंबरे, नामदेव झगडे, दीपक झगडे, संतोष आटोळे, संजय आटोळे, तुकाराम आटोळे, नवनाथ आटोळे, तुषार आटोळे, बंडू आटोळे, सुरेश आटोळे आदी उपस्थित होते.

शिर्सुफळ तलावावर गाडीखेल, नंदादेवी, खडकी, रावणगाव भागातील शेतकरी अवलंबून आहेत. परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. तसेच जनावरांच्या चार्‍यासाठी, पिण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांच्या पिण्यासाठी हा तलाव महत्त्वाचा आहे. मात्र, तलावात अत्यल्प पाणीसाठा असताना शिरसाई योजनेद्वारे साबळेवाडी, गाडीखेल, उंडवडी क. प., उंडवडी सुपे, कारखेल भागांमध्ये पाणी सोडले जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

सध्या तलावात पाणीसाठा खूपच कमी आहे. जनावरांसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शेतकर्‍यांना चार्‍यासाठी व पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. जलसंपदा विभाग व शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असलेला पाणीसाठा स्थानिक शेतकर्‍यांना ठेवण्यात यावा व होणारा संघर्ष टाळावा. शेतकरी व जलसंपदा विभाग यांनी समन्वय साधून हा वाद मिटवावा.
                                 – आप्पासाहेब आटोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य

खडकवासला कार्यकारी अभियंता उपसा सिंचन विभाग यांनी स्थानिक शेतकर्‍यांसाठी शिर्सुफळ तलावातील पाण्याची पातळीही निश्चित करावी. त्यामुळे शेतकरी व अधिकार्‍यांमध्ये होणारा वाद थांबेल. भविष्यातील दुष्काळाची स्थिती पाहता या तलावामध्ये आवर्तन सोडण्यात यावे.
                                             – अतुल हिवरकर, माजी सरपंच, शिर्सुफळ

खडकवासला कार्यकारी अभियंता उपसा सिंचन विभागाने स्थानिक शेतकर्‍यांसाठी पाण्याचा कोटा ठरवून दिला पाहिजे व ठाम निर्णय घेतला पाहिजे. शिरसाई तलावाची पाणीपातळी देखील निश्चित करावी. पाणीपातळी निश्चित नसल्याने आमचा व शेतकर्‍यांचा वारंवार वाद होत आहे. पाणीपातळी ठरविल्यास आमच्यात होणारे वाद थांबतील.
                                                           – अमोल शिंदे, स्थापत्य अभियांत्रिकी

 

Back to top button