‘यशवंत’ कारखान्याची 9 मार्चला निवडणूक | पुढारी

‘यशवंत’ कारखान्याची 9 मार्चला निवडणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या सोमवार (दि. 5) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर, आवश्यकता असेल, तर ‘यशवंत’च्या निवडणुकीसाठी 9 मार्च रोजी मतदान घेतले जाणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्रान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले असून, सहकार उपनिबंधक डॉ. शीतल पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याची अंतिम मतदार यादी 17 जानेवारी 2024 रोजी अंतिम करण्यात आलेली आहे.

शिवाजीनगर येथील साखर संकुल येथील चौथ्या मजल्यावरील सभागृह हे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कार्यालय असणार आहे. उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करता येतील. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील आणि 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत ते दाखल करून घेतले जाणार आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारी अर्ज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता घोषित केले जातील, तर 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.

अंतिम उमेदवारी अर्ज 28 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होऊन पात्र उमेदवारांना निशाणी वाटप केले जाणार आहे. तर, आवश्यकता असेल तर 9 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान स्थळ नंतर कळविण्यात येणार आहे. तर, 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येईल.

रणधुमाळी रंगणार की निवडणूक बिनविरोध होण्यास प्राधान्य?

हवेली तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सहकारातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले होते. कारखान्यातील गैरव्यवस्थापनामुळे 2 एप्रिल 2011 रोजी संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि त्यानंतर जवळपास हा कारखाना बंद अवस्थेत आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी सभासदांनी निवडणूक निधी गोळा केलेला आहे. त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून, हा कारखाना सहकारातच राहावा, यासाठी शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील सहकारातील या कारखान्यावरील सत्तेसाठी बदलत्या राजकीय परिस्थितीत रणधुमाळी रंगणार की निवडणूक बिनविरोध होऊन कारखाना सुरू करण्यास हवेलीतील सर्वपक्षीय नेतृत्व प्राधान्य देणार, हे चित्र लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा

Back to top button