राज्यातील चार गावांत साकारतेय पुस्तकांचे गाव | पुढारी

राज्यातील चार गावांत साकारतेय पुस्तकांचे गाव

सुवर्णा चव्हाण

पुणे : सातारा जिल्ह्यातील भिलार गावातील पुस्तकांचे गाव आपल्याला माहीतच आहे… पण, आता असेच पुस्तकांचे गाव राज्यातील आणखी चार गावांमध्ये उभारले जात असून, राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात पुस्तकांचे गाव उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा चार गावांमध्ये पुस्तकांचे गाव उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप या गावांमध्ये पुस्तकांचे गाव साकारण्यासाठी शासकीय मान्यता मिळाली आहे, या गावांमध्ये पुस्तकांचे गाव उभे राहणार आहे. याशिवाय टप्प्या- टप्प्याने राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही एका गावाची पाहणी आणि ग्रामस्थांशी चर्चा करून पुस्तकांचे गाव उभारले जाणार आहे.

राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील भिलार गावात पुस्तकांचे गाव उभारण्यात आले आहे. या अनोख्या पुस्तकाच्या गावाला देश- विदेशातून हजारो पर्यटकांनी भेट दिली. संस्थेचा हा प्रकल्प यशस्वी ठरला. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणा तीन वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने केली होती. त्या घोषणेनंतर संस्थेकडून त्वरित या प्रकल्पाच्या कामाला जोमाने सुरुवात झाली. सत्तापालट झाल्यानंतर काही दिवस या प्रकल्पाचे काम रखडले होते. पण, आता हे काम गतीने सुरू असून, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि सांगली या जिल्ह्यांमधील चार गावांची पुस्तकांचे गाव उभारणीसाठी निवड झाली आहे.

याविषयी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे म्हणाले, या गावांमध्ये पुस्तकांचे गाव उभारणीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मान्यता मिळालेल्या गावांमध्ये प्रत्येकी दहा दालनांची निवड करण्यात येणार असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेकडून तज्ज्ञ समिती नेमली असून, साहित्य प्रकारानुसार पुस्तकांची निवड करण्यात येत आहे. प्रत्येक दालनासाठी संस्थेकडून एक हजार पुस्तकांची अंतिम यादी तयार करण्यात येत आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या निर्देशानुसार पुस्तक निवडीबाबतची समिती गठीत केली आहे. त्या समितीमध्ये श्यामसुंदर जोशी, अविनाश कोल्हे, रेखा दिघे हे सदस्य आहेत. पुस्तक निवड समितीची बैठक नुकतीच पार पडली आणि समितीकडून दालनांकरिता दहा हजार पुस्तकांची यादी लवकरच तयार करण्यात येणार आहे.

चार गावांमध्ये पुस्तकांचे गाव उभारण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटकांना गावांमध्ये दर्जेदार पुस्तके वाचायला मिळतील आणि वाचकांना वाचनाचा आनंद घेता येईल.

– डॉ. श्यामकांत देवरे, संचालक, मराठी विकास संस्था

हेही वाचा

Back to top button