जेजुरी परिसरात दुष्काळाच्या झळा : नागरीकांचे हाल | पुढारी

जेजुरी परिसरात दुष्काळाच्या झळा : नागरीकांचे हाल

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवू लागला आहे. जेजुरीजवळील दवणेमळा, दोरगेवस्ती, कुंभारकरवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. दवणेमळा, दोरगेवस्ती, कुंभारकरवाडी परिसरात जवळपास 3 हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. या परिसरात पावसाळ्यात केवळ 333 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जलस्त्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नाही.

गेल्या काही दिवसांपासून येथील विहिरी, कूपनलिका, तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे येथील नागरिकांसह जनवरांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. शेतातील पिकेदेखील जळू लागली आहेत. सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी डिसेंबर महिन्यात नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेत प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून दि. 30 जानेवारी रोजी या भागात शासकीय टँकर सुरू करण्यात आले आहेत, याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टँकर सुरू करून नागरिकांचे व जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झगडे, संतोष दोरगे, भरत पवार, दीपक शिर्के, गोरख थोपटे, मधुकर थोपटे, नारायण झगडे, मल्हार झगडे, नवनाथ झगडे यांनी पाठपुरावा केला होता. दुसरीकडे या परिसरात वेळेवर शासन व्यवस्था पोहोचत नसल्याच्या तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या तीनही भागासाठी ग्रुप ग्रामपंचायतीची निर्मिती करावी, अशी मागणी आहे, तीदेखील प्रलंबित आहे.

हेही वाचा

Back to top button