नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांचा जीव टांगणीला | पुढारी

नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांचा जीव टांगणीला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  नायलॉन मांजावर बंदी असतानादेखील बाजारपेठेत हा मांजा छुप्या पद्धतीने विकला जात असल्याने गेल्या चार दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात मांजामध्ये अडकल्याने 4 ते 5 प्राणी जखमी झाले आहेत, अशी माहिती प्राणीमित्रांनी दिली आहे.
संक्रांतीदरम्यान शहरात जोरदार पतंगबाजी सुरू होते; मात्र बंदी असूनही सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे समोर येत आहे. एकीकडे नायलॉन मांजामुळे पक्षी गंभीर जखमी होतात; तसेच अनेक नागरिकदेखील गंभीर जखमी झाल्याच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत. शहरात दरवर्षी मांजामध्ये अडकून अनेक पक्षी गंभीर जखमी होण्याच्या घटना घडतात, तर काही मृत्युमुखी पडतात. झाडांमध्ये किंवा मोबाइल टॉवर, इमारतींच्या गच्चीवर मांजा अडकून राहतो. त्यात अडकून पक्षी जखमी होतात. पक्षीमित्रांकडून नायलॉन मांजावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. सरकारने कागदोपत्री मांजावर बंदीही आणली आहे. प्रत्यक्षात मात्र, आजही शहराच्या विविध भागांत पतंग दुकानांमध्ये सर्रास नायलॉन मांजाची विक्री होताना दिसत आहे.

शहरामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांत थेरगाव येथे घुबड, पिंपळे सौदागर येथे वटवाघूळ, चिंचवड येथे बगळा, चिंचवडगावातील काकडे पार्क याठिकाणी घार, आणि बाणेर येथे एका कबूतर मांज्यात अडकून जखमी झाले होते. त्यांस प्राणिमित्र संघटनांनी वाचविले आहे.
पतंगबाजीसाठी नायलॉन तसेच धार असणार्‍या मांजावर बंदी आहे. असे असले तरी एकमेकांच्या पतंगाचा दोर कापण्यासाठी धारदार मांजा वापरला जातो. त्यामुळे या मांजात अडकून अनेक पक्षी जखमी होतात.

मकरसंक्रांतीपूर्वीच पतंगबाजी करणार्‍यांना प्राणिमित्र संस्था, संघटना आणि प्राणिप्रेमींकडून पतंगबाजी करताना पक्ष्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत मांजात अडकून पंखाला जखम होणे, मान कापली जाणे, पायाला इजा होण्यासोबत मांजात अडकून मृत होण्याचे प्रमाण वाढल्याचेही प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.

Back to top button