Drug Case : ललीत पाटीलवर 2600 पानांचे दोषारोपपत्र दाखल | पुढारी

Drug Case : ललीत पाटीलवर 2600 पानांचे दोषारोपपत्र दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्कर ललीत पाटील पलायन प्रकरणात पोलिसांनी तब्बल 2 हजार 600 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये सचिन वाघ याच्या नावाचा समावेश असून त्याने ललीतला पळून जाण्यात मदत केली होती. या दोघांवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले असून, या गुन्ह्यात एकूण 4 हजार 800 पानांचे आरोपपत्र दाखल झाले आहे. यापूर्वी ललीत पाटीलच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (वय 33) आणि अ‍ॅड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय 39, दोघीही रा. नाशिक), ललीतचा भाऊ भूषण पाटील (वय 34) साथीदार अभिषेक बलकवडे (वय 31, सर्व रा. नाशिक) रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अर्‍हाना (वय 50, रा. कॅम्प), त्याचा चालक दत्तात्रय डोके (वय 40, रा. हडपसर) यांच्या विरोधात तब्बल 2 हजार 200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 223 (सरकारी कर्मचार्‍याला बेदरकारपणे कैदेतून किंवा कोठडीतून पळून जाणे),224, 225 (कायदेशीर अटक करण्यास विरोध करणे), 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) आणि 34 (समान हेतू) या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल केले आहे.

मेफेड्रोन या अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ऑक्टोबर 2020 मध्ये ललीतला अटक केली होती. हर्नियाच्या आजाराचे कारण सांगून तो ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तेथूनच त्याने त्याची ड्रग्ज तस्करी सुरू ठेवली होती. ससून रुग्णालयातून मेफेड्रोन रॅकेट उघड झाल्यानंतर ललीत दोन ऑक्टोबरला पळून गेला होता. त्याला मुंबई पोलिसांनी 17 ऑक्टोबरला अटक केली होती. पाटील याला तळोजा कारागृहातून 31 ऑक्टोबर रोजी पुणे अमलीपदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर पळून गेल्या प्रकरणात अटक केली होती. दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना त्याचा साथीदार सचिन वाघ याला देखील अटक केली होती.

सचिन वाघने ललीतला ससूनमधून पळून गेल्यानंतर सातत्याने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, तो ड्रग्ज रॅकेट चालविणारा त्याचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांच्या सातत्याने संपर्कात होता. त्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावर ललीतबरोबर आरोपपत्र दाखल केले आहे. दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र हे 2600 पानांचे असून त्यामध्ये तब्बल 45 जणांचे जबाब, साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त तसेच प्रभारी सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई आणि त्यांच्या पथकाने तपास करत ललीत पाटील, सचिन वाघ यांच्यावर आरोपपत्र दाखल केले.

Back to top button