47 दिवस लोटले तरीही बर्न वॉर्ड नाही ; दुकानांचे फायर सर्टिफिकेट सर्वेक्षणही रखडले | पुढारी

47 दिवस लोटले तरीही बर्न वॉर्ड नाही ; दुकानांचे फायर सर्टिफिकेट सर्वेक्षणही रखडले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  तळवडे येथील कारखान्यास आग लागल्यानंतर महापालिकेच्या वतीने शहरात बर्न वॉर्ड करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, 47 दिवस उलटूनही अद्याप बर्न वॉर्ड (जळीत रुग्ण उपचार केंद्र) तयार झालेला नाही. तसेच, पूर्णानगर येथील दुकानास लागलेल्या आगीत एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील व्यापारी आस्थापनांचे फायर सर्टिफिकेट सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. त्या घटनेस पाच महिने झाले तरी, अद्याप निम्मा शहराचे सर्वेक्षण झाले आहे. शहरात आगीच्या दुर्घटना वारंवार घडत असताना, महापालिका प्रशासनाच्या या उदासीन कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एका दुकानास लाग लागून दोन कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी (दि.22) मध्यरात्री घडला. आगीचे प्रकार शहरात वारंवार घडत आहेत. तळवडे येथे 8 डिसेंबर 2023 ला एका कारखान्यात आगीची दुर्घटना घडली. त्यात तब्बल 14 महिला कामगारांचा बळी गेला. तर, एका महिलेवर अद्याप उपचार सुरू आहेत. शहरात बर्न वॉर्ड नसल्याने त्या दुर्घटनेतील जखमी महिलांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या घटनेनंतर शहरात महापालिकेचे बर्न वॉर्ड निर्माण करण्याची मागणी वाढली होती. तसेच, हिवाळी अधिवेशनात त्यावर मोठी चर्चा झाली. महापालिकेने तातडीने बर्न वॉर्ड तयार करावा, अशी सूचना महापालिका आयुक्तांना अधिवेशनात करण्यात आली होती.

त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने महापालिकेच्या विविध रुग्णालय इमारतींची पाहणी केली. कोणत्या रुग्णालयात बर्न वॉर्ड तयार करता येईल त्यावर बैठका घेऊन चर्चाही झाल्या. मात्र, आयुक्तांना वेळ मिळत नसल्याने कोणत्या रुग्णालयात बर्न वॉर्ड सुरू करायचा याचा अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे पुढील कार्यवाही रखडली आहे.

दुसरीकडे, महापालिकेने शहरातील व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षण सुरू केले होते. पूर्णानगर येथील एका हार्डवेअरच्या दुकानास 30 ऑगस्ट 2023 ला आग लागून झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील व्यापारी आस्थापना, दुकाने, गोदाम, गॅरेज, बेकरी, हॉटेल, शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, मल्टिप्लेक्स, वर्कशॉप, छोटे कारखाने आदींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार, शहरभरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले.

त्यात फायर सर्टिफिकेट, उद्योग परवाना, अग्नी प्रतिबंधक यंत्रणा आहे किंवा नाही यांची तपासणी केली जात आहे. शहरात 1 लाखापेक्षा अधिक संख्येने अशा व्यावसायिक आस्थापना आहेत. आतापर्यंत 43 हजार आस्थापनांचा सर्व्हे झाला आहे. सर्वेक्षणाचे कामाची मुदत 45 दिवसांची होती. पाच महिने होऊनही अद्याप सर्व आस्थापनांचे सर्वेक्षण झालेले नाही. पालिकेच्या उदासीन कारभारामुळे बर्न वॉर्डची उभारणी झालेली नाही. तसेच, व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षणही पूर्ण झालेले नाही. प्रशासनाच्या या संथ गती कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

Back to top button