आळेफाटा बसस्थानकात दागिने चोरणारी टोळी गजाआड; पोलिसांची मोठी कामगिरी | पुढारी

आळेफाटा बसस्थानकात दागिने चोरणारी टोळी गजाआड; पोलिसांची मोठी कामगिरी

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील एसटी बसस्थानकातून प्रवाशांचे दागिने चोरणारी टोळी आळेफाटा पोलिसांनी गजाआड केली. टोळीमध्ये ७ चोरट्यांसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या २ सोनारांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७ तोळे सोन्याचे दागिने व जीप असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

रामेश्वर अंबादास जाधव (रा. शिरापूर, जि. बीड), विकास शिवाजी गायकवाड (रा. दहिटणा, जि. जालना), आकाश अशोक जाधव (रा. सलगरा, जि. लातूर), दीपक ज्ञानेश्वर जाधव (रा. शिरापूर, जि. बीड), सागर संपतराव झेंडे (रा. बीड), जालिंदर वामन डोकडे (रा. शिरूर कासार, जि. बीड), आरिफ रहेमान शेख (रा. बीड), सोनार अण्णा दिंगबर ढेपे व आकाश बेंद्रे (दोघे रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विजय औटी हे आळेफाटा एसटी बसस्थानकातून मुंबई येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत होते. यावे‌ळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. याबाबतची फिर्याद आळेफाटा पोलिस ठाण्यात औटी यांनी दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषण तसेच खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोनसाखळी चोरणारे चारचाकी वाहनातून येत आळेफाटा बसस्थानकात गर्दीत शिरून प्रवाशांचे दागिने चोरत असल्याचे समजले. त्यानुसार त्या चारकाची वाहनाचा क्रमांक प्राप्त करून चोरट्यांची नावे व पत्ता पोलिसांनी निष्पन्न केला.

त्यानंतर पोलिस पथकाने बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी टोलनाक्यावर सापळा रचून चोरट्यांना जीपसह (एम. एच. 44 बी. ७१३७) पकडले. त्यांनी आळेफाटा बसस्थानक परिसरात एप्रिल २०२३ नंतर ४ गुन्हे केल्याची कबुली दिली. तर या चोरट्यांनी चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या अण्णा ढेपे व आकाश बेंद्रे या सोनारांनाही अटक करण्यात आली. एकूण ७ तोळे सोन्याचे दागिने व जीप जप्त करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, नरेंद्र गायकवाड, भीमा लोंढे, संजय शिंगाडे, संतोष दुपारगुडे, अमित माळुंजे, नवीन आरगडे हनुमंत ढोबळे, केशव कोरडे आदी पोलिस कर्माचाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button