अवकाळीमुळे दुर्दशा ! अंजीर बागांना ढगाळ हवामानाचा फटका | पुढारी

अवकाळीमुळे दुर्दशा ! अंजीर बागांना ढगाळ हवामानाचा फटका

खोर : पुढारी वृत्तसेवा : खोर (ता. दौंड) येथील अंजीर बागांना सध्या सुरू असलेल्या ढगाळ हवामानाचा मोठा फटका बसला जात आहे. अंजीर बागेला पोषक वातावरण मिळत नसल्याने अंजीर उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे व अवकाळीच्या आगमनामुळे अंजीर बागेला फळ पिकण्यास पोषक वातावरण मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. ढगाळ हवामानामुळे अंजीर उकलीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या उकलीमुळे अंजीर उत्पादन क्षमतेत कमालीची घट झाली आहे.
उकल पडलेले अंजीर आज केवळ 15 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत, तर चांगल्या प्रकारचे तयार झालेले अंजीर हे आज बाजारपेठेत 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. सुरुवातीच्या काळात 120 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे अंजीर आज वातावरणाच्या बदलामुळे केवळ निम्म्या दराने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली असल्याचे अंजीर उत्पादक शेतकरी सचिन डोंबे यांनी सांगितले.

पाणीटंचाईची मोठी समस्या
अंजीराचा खट्टा बहार हा संपुष्टात आला असून, यापुढे मीठा बहार घेतला जाणार आहे. मात्र पाण्याने दिलेली ओढ पाहता पुढील हंगाम पार पाडण्यासाठी शेतकर्‍यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आज विहिरी, तलाव, ओढे, नाले, सर्वच पाण्याचे स्रोत आटले गेले असल्याने पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे अंजीर उत्पादक शेतकरी समीर डोंबे यांनी सांगितले.

पाण्यासाठी सिंचन विभाग व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे
दौंड तालुक्याच्या उशाशी असलेल्या पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून आवर्तन सोडून डोंबेवाडी पाझर तलावात पाणी सोडण्याची अंजीर उत्पादक शेतकरी वर्गाची मागणी आहे. जर वेळेत पाणी सुटले, तर अंजीराचा मीठा बहार सुरळीत पार पडला जाईल. मात्र, पाणी जर मिळाले नाही तर अंजीराच्या होणार्‍या कोट्यवधीच्या उत्पादनाला या भागातील शेतकरीवर्ग मुकण्याची शक्यता आहे. सिंचन विभाग व लोकप्रतिनिधिंनी याबाबतचा विचार करण्याची खर्‍या अर्थाने वेळ आली असून अंजीराचा चालू हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button