राज्यात रब्बीच्या 87 टक्के पेरण्या पूर्ण | पुढारी

राज्यात रब्बीच्या 87 टक्के पेरण्या पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 53 लाख 97 हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत 47 लाख 32 हजार हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 88 टक्क्यांइतक्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारीच्या पेरण्या 76.44 टक्के, तर गव्हाच्या 71.24 पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, हरभर्‍याची शंभर टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.

कृषी विभागाच्या 29 डिसेंबबच्या अहवालात पेरणीची स्थिती देण्यात आली आहे. रब्बी ज्वारी पीक आता कणसे लागण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी हुरडा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा ते घाटे लागण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी घाटे पक्वतेच्या अवस्थेत आहे. मका, करडई पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या शेती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे क्षेत्र 12 लाख 87 हजार हेक्टर इतके आहे. राज्यात मका व ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा, हरभरा पिकावर घाटे अळी व मर रोगाचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे.

ज्वारीची पेरणी 76 टक्के झालेली असली तरी गतवर्षापेक्षा चालू वर्षीच्या रब्बी हंगामात 1 लाख 18 हजार हेक्टरने अधिक पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पिकाखालील क्षेत्रवाढ आता होणार नाही. हरभर्‍याची गतवर्षी डिसेंबर महिनाअखेर विक्रमी म्हणजे 25.86 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. ती चालू वर्षी 22.44 लाख हेक्टर इतकी झालेली आहे. त्यामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. गव्हाचे पेरणी क्षेत्रही वाढण्याची अपेक्षा आहे.
– दिलीप झेंडे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय, पुणे

हेही वाचा

Back to top button