मधुमेह ठरू शकतो वंध्यत्वास कारणीभूत; तज्ज्ञांचे निरीक्षण | पुढारी

मधुमेह ठरू शकतो वंध्यत्वास कारणीभूत; तज्ज्ञांचे निरीक्षण

पिंपरी  : पुढारी वृत्तसेवा : उच्च रक्तदाब आणि मधुमेह वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतो. विशेषतः पन्नाशीच्या वरील पुरुषांना मधुमेह असल्यास त्यांना वंध्यत्वाची समस्या जाणवू शकते. त्यामुळे पुुरुषांनी रक्तदाब आणि शरीरातील साखरेची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. वंध्यत्वाची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसून येते.

पुरुषांमधील रक्तातील उच्च साखरेची पातळी आणि प्रजनन समस्या यांच्यात परस्परसंबंध आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या पुरुषांना वंध्यत्व उपचारासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. 2022 मधील अमेरिकन संशोधनानुसार, पन्नाशीपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मधुमेह असल्यास त्यांच्यामध्ये वंध्यत्वाची समस्या 50 ते 60 टक्के दरम्यान आढळत असल्याचा निष्कर्ष आहे, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

वंध्यत्वाची प्रमुख कारणे

मधुमेह, उच्च रक्तदा, उच्च कोलेस्टेरॉल, हृदयविकार, अपघातामुळे निर्माण झालेली समस्या अशी काही प्रमुख कारणे वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रणात असावे.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की शरीरातील नसा खराब होतात. त्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढीस लागू शकते. यावर उपाय म्हणजे मधुमेह असणार्‍या रुग्णांनी साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. वंध्यत्वाच्या समस्येबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून योग्य उपचार शक्य आहेत.

– डॉ. सायली तुळपुळे, मधमुेह तज्ज्ञ

रक्तातील वाढलेल्या साखरेचा परिणाम शुक्राणूंच्या गतिशीलतेवर

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास शरीरातील नसांवर त्याचा परिणाम होतो. त्या खराब होतात. रक्तवाहिन्यांना होणारा रक्तपुरवठा कमी झाल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. रक्तातील साखरेच्या वाढलेल्या प्रमाणाचा थेट परिणाम शुक्राणूंच्या गतिशीलतेवर होतो. त्यावर जीवनशैलीतील बदल हा प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर काही औषधोपचार गरजेचे आहेत. त्यातून प्रजनन उपचाराचे यश वाढू शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

हेही वाचा

Back to top button