Pune : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी केला बसने प्रवास | पुढारी

Pune : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी केला बसने प्रवास

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यासमवेत शिक्रापूर वाहनतळ ते पेरणेफाटा असा बसने प्रवास केला. या वेळी त्यांनी जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांशी संवाद साधला. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सुविधेबाबत त्यांनी अनुयायांशी चर्चा केली. संभाजीनगर येथून आलेल्या अनुयायांनी जिल्हाधिकार्‍यांशी बोलताना करण्यात आलेल्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. वाहनतळावरून दर मिनिटाला बसची सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले. ध्वनिक्षेपकाद्वारे अनुयायांना वाहनतळ, बस व्यवस्था, हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्तींची माहिती आदीबाबत सूचनाही देण्यात येत होत्या. नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, पोलिस अधीक्षक गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण, सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते. तेथूनच आवश्यक सूचनाही देण्यात येत होत्या. संपूर्ण परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केल्याने अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांनी समाधान व्यक्त केले.

चोख सुरक्षा व्यवस्था
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिसांतर्फे जयस्तंभ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्र. सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया, उपायुक्त आर. राजा, शशिकांत बोराटे, रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त विवेक पवार हे संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. पोलिसांकडून गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले. पुणे शहर व ग्रामीण पोलिस दलाने सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button