Bhosari : पीएमपी बसमध्ये विसरलेला मोबाईल केला परत | पुढारी

Bhosari : पीएमपी बसमध्ये विसरलेला मोबाईल केला परत

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या बसमध्ये प्रवाशाचा विसरलेला मोबाईल वाहकाने प्रामाणिकपणे परत केला आहे. वाहक जयश्री मुंडे यांनी तो मोबाईल भोसरीतील बीआरटीएसमधील वाहतूक नियंत्रक कक्षात जमा केला. वाहकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतूक होत आहे. कात्रज ते भोसरीदरम्यान धावणारी बस भोसरीत आली असता सर्व प्रवासी उतरुन गेल्यावर बसस्थानकात स्टँड बुकिंगला असलेली वाहक जयश्री मुंडे या बसमध्ये प्रवाशांची तिकिटे काढण्यासाठी गेल्या असता त्यांना एक मोबाईल सापडला.

त्यांनी तो मोबाईल भोसरीतील बीआरटीएसच्या वाहतूक नियंत्रक कंट्रोलर काळुराम लांडगे, सुरेश बनसोडे, बाळासाहेब नाईकडे यांच्याकडे जमा केला. विसरलेल्या मोबाईलवर फोन आला असता तो भोसरी बीआरटी बसस्थानकात जमा असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

वाहकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतूक

त्यानंतर संबंधित प्रवासी शांतकुमार सायबन्ना दन्नुर हे भोसरी बीआरटी बसस्थानकात आले असता शाहनिशा करून त्यांना मोबाईल दिला. पीएमपीच्या बसमध्ये अथवा बसस्थानकात प्रवाशांच्या सापडलेल्या वस्तू वाहतूक नियंत्रक, वाहक-चालक यांच्याद्वारे प्रवाशांना सुखरूप परत केले जात असल्याने पीएमपीच्या कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रक यांनी प्रवाशांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या कामगिरीबद्दल पीएमपीच्या सर्वच वाहक-चालक, कर्मचारी, वाहतूक नियंत्रक यांचे भोसरी परिसरात कौतूक होत आहे.

हेही वाचा

Back to top button