मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निकष नव्याने निश्चित होणार | पुढारी

मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निकष नव्याने निश्चित होणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यासाठी सध्याच्या निकषांत बदल करून नवीन निकष जारी केले जाणार असून राज्य मागास वर्ग आयोगाच्या बैठकीत त्यावर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. ही बैठक बुधवारी पुण्यात होणार आहे.  मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 2008 नंतरची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती काय आहे, याचा शोध घेण्यासाठी निकषांत बदल करण्यावर विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. मराठा समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकष आणि त्यासाठी देण्यात येणारे गुण यासंदर्भात चर्चा होऊन निर्णय होणार आहेत. यापूर्वीच्या आयोगाने ठरविलेल्या निकषातील गुण बदलण्यात येणार असल्याची माहिती  मिळाली आहे.
राज्य मागास वर्ग आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष, तसेच सदस्य यांनी राजीनामे दिल्यानंतर राज्य शासनाने आयोगासाठी नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे (निवृत्त न्यायाधीश) आणि सदस्यांची नियुक्ती केली. या आयोगाची तातडीची बैठक नागपूर येथे झाली. त्यानंतरची बैठक पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नव्याने निकष आणि त्यासाठीचे गुण निश्चित ठरविण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या सूचनेवरून राज्य मागास वर्ग आयोगाकडून मागासलेपणाच्या निकषात काही बदल केले जाणार आहेत. यासाठी पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेकडून सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत नेमण्यात आलेल्या वेगवेगळ्या आयोगांकडून मराठा समाजाचे सर्वेक्षण 2008 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आले होते. मात्र, आता मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती 2008 पासून पुढच्या आकडेवारीच्या आधारे तपासली जाणार आहे.
सामाजिक निकषात चार मुद्दे समाविष्ट आहेत. शैक्षणिक निकषामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण, बारावी, पदवी, अन्य शिक्षण यांची नोंद घेण्यात येणार आहे. अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे प्रमाणही नोंदविण्यात येणार आहे. आर्थिक निकषांमध्ये दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांचे प्रमाण, कच्च्या घरांमध्ये राहणारी कुटुंबे, अल्पभूधारक कुटुंबे, भूमिहीन कुटुंबे यांची नोंद घेण्यात येणार आहे.
असे असणार निकष
सामाजिक निकषांपैकी तीन निकषांसाठी प्रत्येकी वीस गुण, तर चार निकषासांठी प्रत्येकी दहा गुण देण्यात येणार आहेत.
* जाती, पारंपरिक व्यवसाय, हस्तकला कारागीर, रोजगार या कारणास्तव अशा वर्गाला सामाजिक स्तरात सामान्यतः कनिष्ठ समजले जाते.
* राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया या निर्वाहाकरिता व्यवसाय, रोजगार, मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेल्या आहेत.
* राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुष हे निर्वाहाकरिता व्यवसाय, रोजगार, मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले आहेत.
या तीन निकषासाठी प्रत्येकी 20 गुण दिले जाणार आहेत.

Back to top button