Pune News : ख्रिसमसनिमित्त हर्षोल्हास | पुढारी

Pune News : ख्रिसमसनिमित्त हर्षोल्हास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चर्चमध्ये सकाळी झालेली विशेष भक्ती, त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले समाजबांधव, घरोघरी रंगलेली ख्रिसमस पार्टी, शहरातील रस्त्यांवर रंगलेला ख्रिसमसचा माहोल अन् लाल रंगातील फुगे, विद्युत रोषणाई अन् गर्दीने फुललेले रस्ते… अशा आनंदी अन् उत्साही वातावरणात सोमवारी (दि.25) ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला.

सकाळी सुरू झालेले सणाचे सेलिब्रेशन रात्रीपर्यंत सुरू होते आणि सायंकाळनंतर ठिकठिकाणी रंगलेल्या ख्रिसमस पार्टीचा तरुणाईने आनंद लुटला. घरोघरीही सणाचे सेलिब्रेशन रंगले आणि प्रत्येकाने उत्साहात, आनंदात हा सण साजरा केला. ख्रिसमस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणच्या चर्चसह घरोघरी ख्रिसमसनिमित्त आनंदाचे वातावरण रंगले होते. प्रभू येशू यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी सहा ते साडेदहा या वेळेत विशेष भक्तीचे आयोजन केले होते. त्यासोबतच चर्चमध्ये आनंद गीते (कॅरल गीते) सादर करण्यात आली.

फुलांच्या आकर्षक सजावटी अन् विद्युत रोषणाईने वेगळेच वातावरण निर्मिले. लाल रंगाच्या पेहरावात समाजबांधव विशेष भक्तीत सहभागी झाले. यानिमित्ताने समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. दिवसभर चर्चमध्ये समाजबांधवांनी भेट दिली अन् कार्यक्रमांत सहभाग गेतला. कॅम्प, खडकी, कोरेगाव पार्क अशा विविध भागातील चर्चमध्ये ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला. चर्चसह घरोघरीही ख्रिसमसचे चैतन्य पाहायला मिळाले. काहींनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.

शहरात ठिकठिकाणी ‘सेलिब्रेशन मूड’

शहरातील विविध ठिकाणी ख्रिसमस सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला. विविध रस्त्यांना ख्रिसमसचे सेलिब्रेशन रूप प्राप्त झाले होते. लाल पेहरावातील तरुणाईच्या हाती लाल फुगे, सांताक्लॉजचे मुखवटे घातलेली तरुणाई अन् विद्युत रोषणाईने रस्त्यांना वेगळेच रूप प्राप्त झाले. कॅम्प येथील महात्मा गांधी रस्ता येथे ख्रिसमस सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला. सायंकाळी सातनंतर येथे ख्रिसमसनिमित्त तरुणाईची गर्दी झाली आणि त्यांनी सणाचे सेलिब्रेशन केले. रस्ते आणि दालने आनंदोत्सवात रंगले होते. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी अनेकांनी हॉटेलमध्ये गर्दी केली अन् स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटला. खासकरून कॅम्प, डेक्कन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता येथे रात्रीपर्यंत गर्दी पाहायला मिळाली.

हेही वाचा

Back to top button