Pune : ‘सोमेश्वर’च्या गाळपावर कोयता बंदचा परिणाम | पुढारी

Pune : ‘सोमेश्वर’च्या गाळपावर कोयता बंदचा परिणाम

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  ऊसतोडणी व ऊस वाहतुकीत वाढ करावी यासाठी ऊसतोडणी व वाहतूकदार यांनी 25 डिसेंबर पासून कोयता बंद आंदोलन पुकारले आहे. याचा परिणाम सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळपावर झाला. जवळपास निम्मी वाहने गटात उभी असल्याचे चित्र सोमेश्वर कारखाना परिसरात सोमवारी पाहायला मिळाले. तर हार्वेस्टर आणि ट्रक या वाहनातूनच फक्त ऊस गाळपासाठी आला. बैलगाडी आणि डम्पिंगची ऊस तोडणी बंद होती.

गेल्या पाच वर्षांपासून मागणी करूनही वाहतुकीत वाढ होत नसल्याचे सोमेश्वर परिसरातील ऊस वाहतूकदार मुकादम यांनी सांगितले. ऊसतोडणी वाहतूकदार- मुकादम यांचा ऊसतोडणी भाव वाढीसाठी संप सुरू आहे. ऊसतोडणी संघटना व साखर संघ यांच्यात दर तीन वर्षांनी ऊसतोडणी व वाहतुकीचे दर ठरवले जातात. सन 2020 ते 2023 या कराराची मुदत संपली आहे. नवीन करार करण्यासाठी साखर संघासोबत आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या. पहिल्या बैठकीत 7, दुसर्‍या बैठकीत 24, तिसर्‍या बैठकीत 27 टक्के भाववाढीचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे. मात्र, ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम यांना 50 टक्के भाववाढ हवी आहे.

महाराष्ट्र व शेजारील राज्यात ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात मोठी तफावत आहे. परिणामी, मजूर दुसर्‍या राज्यात जात आहेत. त्याचा परिणाम राज्यातील साखर कारखान्यावर झाला आहे. राज्यातील सगळे कारखाने मजुराअभावी पाहिजे तेवढा ऊसपुरवठा करू शकत नाहीत. राज्यातील 50 टक्के कारखाने 24 तासांपैकी 8-10 तास उसाअभावी बंद ठेवावे लागत आहेत, त्यामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी ऊस वाहतूकदार संघटनेने केली आहे.

हेही वाचा :

Back to top button