Market update : पुण्यात फळभाज्या महागच | पुढारी

Market update : पुण्यात फळभाज्या महागच

शंकर कवडे

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होती. मात्र, बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने मटार, टोमॅटो, काकडी, गाजर व कोबी वगळता अन्य सर्व फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मटार, टोमॅटो, काकडी, गाजर व कोबीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने टिकून होते. रविवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात 100 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक येथून 2 टेम्पो, मध्य प्रदेश आणि पंजाब येथून 24 ते 25 ट्रक मटार, कर्नाटक येथून पावटा 3 ते 4 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 5 ते 7 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 650 गोणी, भेंडी 4 ते 5 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो सुमारे अकरा ते बारा हजार क्रेट्स, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा जूना आणि नवीन सुमारे 150 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 ते 55 टेम्पो आवक झाली होती.

कोथिंबिरीची दीड लाख गड्डीची आवक
पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी (द़ि 24) कोथिंबिरीची दीड लाख गड्डी, तर मेथीची 60 हजार गड्डीची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोंथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली. बाजारात दाखल होत असलेल्या पालेभाज्यांना मागणीही चांगली असल्याने घाऊक व किरकोळ बाजारातील दर टिकून होते.

Back to top button