महामंडळाचा कारभार ! नादुरुस्त एसटीमुळे विद्यार्थ्यांच्या सहलीवर विरजण | पुढारी

महामंडळाचा कारभार ! नादुरुस्त एसटीमुळे विद्यार्थ्यांच्या सहलीवर विरजण

मंचर : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या बस वारंवार नादुरुस्त झाल्याने सहलीसाठी गेलेल्या पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील शिक्षक व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना गुरुवारी (दि. 21) घडली. पोंदेवाडी येथील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन गुरुवारी केले होते. निघोज कुंड, माऊली मळगंगा, शनिशिंगणापूर, शिर्डी असे एकदिवसीय सहलीचे स्वरूप होते. यासाठी मंचर एसटी आगाराच्या दोन बस ठरविण्यात आल्या होत्या. बसचे एकूण भाडे 38 हजार रुपये भरण्यात आले. पोंदेवाडी येथून गुरुवारी सकाळी सहल निघाली. बस एकामागोमाग जात असताना एका बसचा पट्टा तुटल्याने निघोज (ता. पारनेर) गावात बस बंद पडली. मुख्याध्यापक, शिक्षक यांनी फोनवर संपर्क करून पट्टा उपलब्ध केला.

संबंधित बातम्या :

त्यानंतर गाडी सुरू केली. तोपर्यंत दुसरी गाडी विद्यार्थ्यांना घेऊन पुढे गेली होती. सदर बस वायरिंग जळाल्याने वडझीरे गावच्या हद्दीत बंद पडली. त्या बसमधील शिक्षकांनी शिरूर एसटी आगाराला संपर्क करून दुसरी गाडी मागवली. सदर गाडी अडीच तासांनंतर आली.
दोन्ही गाड्या शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या असता मनमाड महामार्गावर दुपारी 2 च्या सुमारास पुन्हा पट्टा तुटल्याने गाडी बंद पडली. मुख्याध्यापक संभाजी लोखंडे यांनी श्रीरामपूरजवळील एसटी आगाराला संपर्क करून दुसर्‍या बसची मागणी केली. परंतु, सायंकाळी साडेपाचपर्यंत बस उपलब्ध झाली नाही. शैक्षणिक सहलीसाठी मंचर एसटी आगाराने नादुरुस्त गाड्या दिल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. सहलीसाठी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या आनंदाने निघाले होते. परंतु, त्यांच्या आनंदावर बस वारंवार नादुरुस्त झाल्याने विरजण पडले. अनेक विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत जेवणदेखील मिळाले नव्हते, असे आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले.

एसटी गाड्या अद्ययावत देण्यासाठी नेहमीच आमचा प्रयत्न असतो. गाड्यांत तांत्रिक बिघाड झाला आहे. यापुढे अद्ययावत गाड्या देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गाड्या नादुरुस्त झाल्याबाबत खेद व्यक्त करतो.
                                                बालाजी सूर्यवंशी, मंचर एसटी आगारप्रमुख

 

Back to top button