Kasturi Club : बहारदार लावण्यांवर महिलाही थिरकल्या | पुढारी

Kasturi Club : बहारदार लावण्यांवर महिलाही थिरकल्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लावणी कलाकार मंजू वाघमारे आणि सहकार्‍यांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांवर थिरकण्याचा आनंद महिलांनीही घेतला. निमित्त होते ‘महाराष्ट्राची शान… मराठमोळी लावणी’ कार्यक्रमाचे. दै. ‘पुढारी कस्तुरी क्लब’ आणि सोनी मराठी आयोजित हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमात महिलांनी मनसोक्त थिरकण्यासह कलाकारांसोबत मनमोकळा संवादही साधला.

तसेच कलाकारांसोबत महिलांनी रिल्सही काढले आणि या वेळी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये बक्षिसे जिंकण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. हा कार्यक्रम महिलांना वेगळाच आनंद देऊन गेला. नृत्य कलाकार मंजू वाघमारे व सहकारी नृत्य कलाकार अनुजा पाध्ये, सायली पाटील, जयश्री राऊत, वृषाली सातपुते, प्रिया चव्हाण यांच्या बहारदार नृत्याने कस्तुरींची मने जिंकली. या कार्यक्रमाचे निवेदन मेघना झुझम यांनी तितक्याच खुमासदारपणे केले. प्रत्येक कस्तुरीला आकर्षक भेटवस्तू व लकी ड्रॉची बक्षिसे जिनियस ग्रुप, फिरस्ती टूर्स, नोबेल मंगलदीप कॅन्सर फाउंडेशन व सुनंदा डेरे यांच्या वतीने वितरित करण्यात आली.

‘पुढारी कस्तुरी क्लब’चे कार्यक्रम नावीन्यपूर्ण आणि नियोजनबद्ध असतात. त्यामुळेच आम्हाला ‘कस्तुरीक्लब’सोबत कार्यक्रम करण्यास विशेष आनंद होत आहोत.

 – डॉ. गिरिजा पाटील, अध्यक्षा, नोबेल मंगलदीप कॅन्सर फाउंडेशन

‘पुढारी कस्तुरी क्लब’चे कार्यक्रम खूप चांगले असतात. कार्यक्रमात महिलांनी केलेले सादरीकरण आणि सदस्य महिलांचा उत्साह नेहमीप्रमाणे उत्तम होता. हादेखील कार्यक्रम सुंदर झाला.

– छाया पांचाळ, संस्थापिका, जिनियस ग्रुप.

धकाधकीच्या जीवनात महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजे ‘पुढारी कस्तुरी क्लब’. त्यांचे विविध उपक्रम कौतुकास्पद असतात. या उपक्रमात सहभागी होऊन आनंद झाला.

– श्रावणी कुलकर्णी, संचालक, फिरस्ती टूर्स.

‘कस्तुरी क्लब’मधील कस्तुरींचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. कार्यक्रमात केलेले सादरीकरण खूपच छान होते.

– सुनंदा डेरे.

हेही वाचा

Back to top button