चंपाषष्ठी : कांदापात, मेथी अन् वांग्यांनी खाल्ला भाव | पुढारी

चंपाषष्ठी : कांदापात, मेथी अन् वांग्यांनी खाल्ला भाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चंपाषष्ठीनिमित्त करण्यात येणार्‍या नैवेद्यासाठी लागणार्‍या कांदापात, मेथी, वांगी यांना सोमवारी (दि. 18) बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी राहिली. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत मेथीची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांदापातीच्या एका जुडीला 30 रुपये, तर मेथीच्या एका जुडीला 30 ते 35 रुपये दर मिळाला. तर, वांग्याची 40 ते 50 रुपये पावशेर या दराने विक्री सुरू होती.

पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड तालुक्यातून मार्केट यार्डातील तरकारी विभागात कांदापातीच्या 20 हजार जुडींची आवक झाली. मेथीच्या 25 हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडीला 1500 ते 2500 रुपये असे दर मिळाले. कांदापातीच्या शेकडा जुडींना 800 ते 1600 रुपये दर मिळाले. नाशिक, जालना, पुणे जिल्ह्यांतील शेतकर्‍यांनी मेथी विक्रीस पाठविली. मेथीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याने दरवाढ झाली.

कांदापात, मेथीच्या मागणीत वाढ झाली असून, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. कांदापात, मेथीखेरीज वांग्यांनाही चांगली मागणी राहिली. मागणीच्या तुलनेत वांगीचीही आवक कमी राहिल्याने वांगीच्या दरात वाढ झाली होती. घाऊक बाजारात दहा किलो वांग्यांना 400 ते 500 रुपये दर मिळाल्याची किरकोळ बाजारात पावशेर वांग्यांची विक्री 40 ते 50 रुपये दराने केली जात असल्याची माहिती भाजी विक्रेते चरण वणवे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button