Pune News : ‘ससून’च्या बर्न वॉर्डवर येतोय ताण | पुढारी

Pune News : ‘ससून’च्या बर्न वॉर्डवर येतोय ताण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात आगीच्या वाढत्या घटनांमुळे जास्तीत जास्त बर्न वॉर्डची गरज भासू लागली आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये आगीच्या घटनांमध्ये किरकोळ जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचारांची सोय असते. मात्र, 30 टक्क्यांहून जास्त प्रमाणात जखमी झालेल्या रुग्णांना अद्ययावत उपचारांची गरज भासते. पुण्यात सध्या केवळ ससूनमध्ये उपचारांची सोय असल्याने रुग्णालयावर ताण येत असल्याचे चित्र आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या इन्फोसिस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जळीत वॉर्ड (बर्न वॉर्ड) आहे. येथे 20 खाटांची सोय उपलब्ध आहे.

शहरात खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांचे जाळे पसरलेले असताना केवळ सूर्या सह्याद्री या एकाच रुग्णालयामध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध असलेला बर्न वॉर्ड आहे. जिल्ह्यात कोठेही आगीच्या घटना घडल्यास गंभीर रुग्ण ससूनला पाठवले जातात. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही बर्न वॉर्ड सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. शहरातील बहुतेक खासगी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालये किरकोळ भाजलेल्या रुग्णांवर उपचार करू शकतात. परंतु, सर्व गंभीर रुग्ण ससूनकडे पाठवले जातात. संपूर्ण उपचारासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी खूप खर्च येतो.

नुकत्याच घडलेल्या तळवडेच्या घटनेने शहरामध्ये अशी कोणतीही घटना घडल्यास गंभीर भाजलेल्यांसाठी वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. ससूनमधील प्लास्टिक सर्जरी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. निखिल पानसे म्हणाले, ‘आमच्याकडे वर्षभरात सुमारे 500 रुग्ण दाखल होतात. त्यांना अद्ययावत उपचारांची गरज असते. वॉर्डमधील सुमारे 70-80 टक्के खाटा कायम व्यापलेल्या असतात. ससूनमध्ये आगींमधील जखमी, इलेक्ट्रिकल बर्न, थर्मल बर्न इंज्युरीचे रुग्णही दाखल होतात. बर्न वॉर्डचे विविध ठिकाणी विकेंद्रीकरण केल्यास रुग्णांना जलद उपचार मिळण्यासाठी मदत होईल.’

उपचाराचा कालावधी 2 महिन्यांचा

सूर्या सह्याद्री रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये 6 खाटांचा आयसीयू आणि 4 खाटांचा खाजगी वॉर्ड आहे. येथे महिन्याला सरासरी 8 ते 10 रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णावर उपचार करण्यासाठी सरासरी कालावधी 1 ते 2 महिन्यांपर्यंत असतो. बर्न युनिटच्या टीममध्ये 6 डॉक्टरांसह एकूण 18-20 सदस्यांचा समावेश आहे, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याने बर्न वॉर्ड (भाजलेल्या रुग्णांचा कक्ष) इन्फोसिसच्या इमारतीत हलवण्यात आला आहे. हेरिटेज जेकबमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. जेकब ससूनमध्ये नवीन वॉर्ड तयार होईल तेव्हा बर्न्स वॉर्डमध्ये सुमारे 35 बेड केले जाणार आहेत.

– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय

हेही वाचा

Back to top button