Pune News : पालिकेचा पर्यावरण अहवाल म्हणजे ’कट पेस्ट’? | पुढारी

Pune News : पालिकेचा पर्यावरण अहवाल म्हणजे ’कट पेस्ट’?

आशिष देशमुख

पुणे : शहरात प्रदूषणाने कळस गाठला आहे, मात्र त्याचा महापालिकेवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. दर वर्षी प्रशासन पर्यावरण अहवाल प्रसिद्ध करते. मात्र, त्यात वायू प्रदूषणाची आकडेवारी आटोक्यात असल्याचे दाखवण्यात येते. सफर संस्था जे हवा प्रदूषण नोंदवते त्याचा साधा बोर्ड देखील पालिका लावत नाही. मात्र, अहवालात प्रदूषण कसे कमी करणार, यावर आश्वासनांची खैरात आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पर्यावरण अहवालाचे वर्णन ‘कट पेस्ट’ असेच केले आहे.

दिल्लीनंतर पुणे शहरातील हवा प्रदूषण सर्वाधिक आहे. यंदाच्या दिवाळीत पुणे शहरात दिल्लीनंतर सर्वाधिक आतषबाजी झाली. त्यामुळे शहरातील हवा प्रदूषण हा पुन्हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. शहरात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची सफर या संस्थेसह राज्य प्रदूषण मंडळ देखील हवा प्रदूषण मोजते. मात्र, रोजच्या या बदलांची नोंद महापालिकास्तरावर घेतली जात नाही. त्यांचा फक्त वार्षिक पर्यावरण अहवाल प्रसिद्ध होतो. त्यात सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मर्यादेतच दाखवले जाते. त्यामुळे नागरिकांनी या अहवालावरच गंभीर आक्षेप घेत त्याचे ‘कट पेस्ट’ अहवाल, असे वर्णन केले आहे.

ते फुफ्फुस पालिकेने का काढले…

असर या संस्थेच्या वतीने वर्षभरापूर्वी शहरातील वायू प्रदूषण मोजणार्‍या ‘डिजिटल फुप्फस’ची प्रतिमा जंगली महाराज रस्त्यावर लावण्यात आली होती. हे फुफ्फुस पंधरा दिवसांतच काळे झाले. नागरिकांना यामुळे डिजिटल फुफ्फुसाने हवेची गुणवत्ता कशी आहे, हे कळत होते. मात्र, ते महापालिकेने काही दिवसांत हटवले.

पुणे महापालिकेला केंद्र शासनाने पर्यावरण सुधारण्यासाठी किमान 100 कोटींच्यावर निधी दिला आहे. असे असताना कचर्‍याच्या गाड्यांवर ताडपत्री टाकली जात नाही. धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेकडून काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. पुण्याची हवी इतकी कधीच खराब नव्हती. पालिकेने आता तरी उपाययोजना करावी. यासाठी नागरिकांना सोबत घ्यावे. त्यांना आम्ही सहकार्य करायला तयार आहोत.

डॉ. उमेष कहाळेकर, ज्येष्ठ नागरिक, वाघोली

नागरिकांना खरेतर प्रदूषणाची माहिती पालिकेने रोज द्यायला हवी. हवा प्रदूषणाचे डिजिटल बोर्ड शहरात लावायला हवेत. पण, सर्व खापर आपल्यावर फुटेल, या भीतीने अधिकारी ती जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. पर्यावरण अहवालही सदोष वाटतो. मागच्या वर्षीचा अहवाल असतो त्यातच थोडेफार बदल केलेले असतात. याला आजच्या भाषेत ‘कट पेस्ट रिपोर्ट’ म्हणतात.

-संतोष पाटील, ज्येष्ठ नागरिक, कर्वे रस्ता

हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी वाढलेली असतेच. सध्या शहरात मेट्रोची कामे सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढले, हे खरे आहे. त्यामुळे महामेट्रो प्रशासनाला आम्ही त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेथे मोठ्या प्रमाणात धूळ तयार होत आहे तेथे पाण्याचे स्प्रिंकलर लावण्यास सांगितले आहे. तसेच शहरात इलेक्ट्रिक बस 450 आहेत, सीएनजी बस वाढवत आहोत. आम्ही आमच्या बाजूने काम करीतच आहोत. पण, फटाके कमी फोडा, असे आवाहन करूनही लोकांनी खूप फटाके फोडले. त्यामुळे आता आम्हाला नागरिकांचे सहकार्य हवे आहे.

-मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका

पुण्यातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागे महापालिका प्रशासनाची चुकीची धोरणे व कार्यवाहीतील त्रुटी कारणीभूत आहेत. झाडांची निर्दयपणे कत्तल, टेकड्यांसह नदी-नाल्यांवर अतिक्रमण, पीएमपीएमएलकडे पूर्ण दुर्लक्ष, बीआरटी मोडीत काढणे,
उड्डाणपूल व मोठे रस्ते बांधण्याला प्राधान्य, ज्यामुळे वाहनांच्या संख्येत बेसुमार वाढ होत आहे, अशा आत्मघातकी धोरणांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण अहवालात प्रदूषणाची पातळी कमी दाखवणे म्हणजे परिस्थिती तितकी वाईट नाही, हे दाखविण्याचा महापालिकेचा केविलवाणा प्रयत्न असू शकतो.

– प्रशांत इनामदार,
वाहतूक तज्ज्ञ

पालिकेत का नाही ‘एक्युआय’चा बोर्ड…

शहराच्या रोजच्या हवेची गुणवत्ता मोजणार्‍या संस्था शहरात असताना नागरिकांना सतर्क करण्यासाठी एक्युआय (एअर क्वालिटी इन्डेक्स) चा बोर्ड रोज लावायला हवा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पालिकेला केंद्र शासनाकडून मोठा निधी येतो, त्याचा हिशेब नागरिकांना पालिकेने द्यायला हवा, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. शहरात सूक्ष्म धूलिकण (पी.एम.10) व अतिसूक्ष्म धूलिकण (2.5) याचे प्रमाण खूप वाढलेले असतानाही याबाबतचा बोर्ड कुणी लावत नाही.

पर्यावरण अहवालात प्रदूषण कमी दाखवले

महापालिकेच्या 2022-23 या वर्षाच्या पर्यावरण अहवालात सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण खूप कमी दाखवले आहे. सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पी.एम.-10) हे केवळ 60 ते 70, तर अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) चे प्रमाण 70 ते 100 दाखवले आहे. प्रत्यक्षात सफर संस्थेच्या रोजच्या नोंदीनुसार शहरातील सरासरी हवेची गुणवत्ता 132 ते 180 च्या दरम्यान आहे. शिवाजीनगरमधील हवेची गुणवत्ता सतत 202 च्या वर आहे.

हेही वाचा

Dhangar Reservation : अजित पवारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

Pune News : जलसंपदाच्या जागेवर पोसणार बिल्डर

Pune News : देशात राज्यकर्त्यांविरोधात वातावरण : शरद पवार

Back to top button