Pune News : शरद पवारांनी मराठा समाजाला न्यायच दिला : विकास लवांडे | पुढारी

Pune News : शरद पवारांनी मराठा समाजाला न्यायच दिला : विकास लवांडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजावर अन्याय केला हा आरोप अत्यंत निराधार व राजकीय द्वेषापोटी होत आहे. पवार यांनी मराठा समाजासह सर्वच जाती धर्माना न्याय दिला आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शरद पवार हे कोणत्याही एका जात समुहाचे नेते नसून सर्व धर्म समभावी, जाती धर्म निरपेक्ष, पुरोगामी विचारांचे लोकनेते आहेत त्यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असतांना जे जे निर्णय व धोरण राबविली त्याचा फायदा मराठयांसह सर्वच जाती समुहांना झालेला आहे. पवार साहेबांनी कायमच विविध घटकांना आर्थिकदृष्टया मदत होईल अशी धोरणे राबविली आहे.  मराठा समाजातील युवा वर्गानि शरद पवार यांच्या विरोधातील अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन ही लवांडे यांनी यावेळी केले.

ओबीसीसाठी केंद्राचे २७ टक्के व राज्यांचे १९ टक्के आरक्षण आहे. त्याबाबत १९९४ नंतर २०१८ पर्यंत कुणीही कुठेही आक्षेप वा याचिका दाखल केलेली नाही.  सध्या बाळासाहेब सराटे व इत्यादांनी केलेली याचिकेवर ३ जानेवारी रोजी सुनावणी होणार असून तत्पूर्वी १० डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यशासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने जातवार जनगणना करून मराठा, धनगर, मुस्लिम इत्यादी सर्व जात समूहांना न्याय मिळवून द्यावा. काही वर्षापासून देशभरातून मागणी होत असतांना जातवार जनगणना करण्यास भाजप नकार देत असल्याचा आरोप ही लवांडे यांनी यावेळी केला.

दिवाळीनंतर युवा संघर्ष यात्रा

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा व ऐक्य टिकून राहावे तसेच सर्व जाती समुहांचे आर्थिक, शैक्षणिक व रोजगाराचे प्रश्न सुटावेत त्यासाठी युवा संघर्ष यात्रा सुध्दा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे- नागपूर (८०० कि.मी.) दिनांक १६ नोव्हेंबर पासून पुनश्चः सुरु होत आहे. त्यात सर्व युवा वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन विकास लवांडे यांनी यावेळी केले.

हेही वाचा

Back to top button