नगर जिल्ह्यात पाच दिवसांत आढळल्या 85 हजारांवर कुणबी नोंदी | पुढारी

नगर जिल्ह्यात पाच दिवसांत आढळल्या 85 हजारांवर कुणबी नोंदी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या पाच दिवसांत जिल्हाभरात 46 लाख शासकीय दस्तावेजांची तपासणी केली असता 85 हजारांवर कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पहिल्या दिवशी 10 हजारांवर कुणबी नोंदी आढळल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून शिक्षण, महसूल, महापालिका, नगरपालिका, कारागृह, सहनिबंधक, भूमिअभिलेख आदीसह विविध विभागांच्या वतीने तपासणी सुरु आहे. जिल्हास्तरीय कक्षाकडे तालुकास्तरावरुन माहिती जमा करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

गेल्या पाच दिवसांत 46 लाख दस्तावेजाची तपासणी केली आहे. त्यातून 85 हजारांवर कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक जणांकडे कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. जातपडताळणी समितीने गेल्या सात वर्षांत 56 हजारांवर व्यक्तींना जातवैधता प्रमाणपत्र दिले आहे.महसूल विभाग जन्म-मृत्यू, कढईपत्रक व सातबारा याव्दारे जवळपास 6 लाख नोंदी शोधणार असल्याचे उपजिल्हाधिकारी अतुल सोरमारे यांनी सांगितले.अहमदनगर तालुक्यात 1 लाख 5 हजार शासकीय नोंदी तपासण्यात आल्या आहेत. या तपासणीत 494 कुणबी नोंदी आढळून आल्याचे तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले.
तालुकास्तरीय कक्षाकडून उपलब्ध झालेल्या कुणबी नोंदीचे प्रमाणीकरण करुन ते जिल्हास्तरीय संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहे. जिल्हास्तरीय कक्षाकडे उपलब्ध झालेली आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविली जात आहे. अनेक नोंदी मोडी भाषेत आढळून येत आहे. या मोडीचे वाचन करण्यासाठी मोडी तज्ञाची नियुक्ती देखील प्रशासनाने केली आहे.

संबंधित बातम्या

जेऊरमध्ये आढळली दोनशे वर्षांपूर्वीची नोंद!

जिल्ह्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी शिक्षण विभागाची शोध मोहीम अखेरच्या टप्प्यात आहे. यामध्ये आतापर्यंत 12 हजार 145 कुणबी नोंदी आढळल्या असून, यात सर्वांत जुनी नोंद ही 200 वर्षांपूर्वीची बायजाबाई जेऊर येथील 1815 मधील सापडल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सूचनांनुसार शिक्षणाधिकारी भास्कर पाटील तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र दिले होते. या संदर्भात मिटींग घेऊन ही मोहीम राबविण्याबाबतचे मार्गदर्शन केले होते. त्यासाठी मोडी, इंग्रजी आणि देवनागरीतील नोंदी कशा ओळखायच्या, विशेषतः मोडीतील कुणबी शब्द हा कसा असेल याचे नमुनेच मुख्याध्यापकांना पाठविले होते.

जिल्ह्यातील अनुदानित 5 हजारांपेक्षा अधिक शाळांत ही नोंद शोधमोहीम राबविली गेली. त्याचे दोन टप्पे करण्यात आले होते. यातील पहिला टप्पा हा 31 डिसेंबर 1948 पूर्वीचा, तर दुसर्‍या टप्प्यात 1967 पर्यंत्तच्या कुणबी नोंदी शोधण्यात आल्या.

सुमारे 24 लाख नोंदीची पडताळणी
शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद असलेले दप्तर तपासणी करण्यात आली. अशा दप्तरांतून सुमारे 24 लाख तत्कालीन विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदी तपासण्यात आल्या. यात 12 हजार 145 कुणबी नोंद असल्याच्या आढळून आले आहे.

तब्बल दोनशे वर्षांपूर्वीची कुणबी नोंद सापडली
बायजाबाई जेऊर येथील यादव धोंडू मगर यांची 1815 मधील दोनशे वर्षापूर्वीची कुणबी नोंद आढळली. त्या वेळी सरकारी शाळा नव्हत्या. मात्र ऐच्छिक शाळा असतानाही ही नोंद सापडली. ही नोंद मोडी लिपीतील असल्याचे सांगितले जाते.

‘कुणबी’ऐवजी ‘मराठा’च्या नोंदी लागल्या
जिल्ह्यात कुणबी नोंदी कमी आढळल्या असल्या तरी या मोहिमेतील निरीक्षणानुसार 1948 पूर्वीच बहुतांश नोंदी सापडल्या. मात्र त्यानंतर ‘कुणबी’ ऐवजी ‘मराठा’ ही नोंद अनेक वारसांनी लावल्याचे बोलले जाते. त्यामुळे आज सापडलेल्या 12 हजार 145 नोंदींमधील व्यक्तींचे आजचे वारस कुणबीच असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.

नगर शहरात सापडल्या इंग्रजीत नोंदी
शाळेच्या दप्तरात मराठीसह मोडी भाषेत ‘कुणबी’ नोंदी आढळल्या. तसेच नगर शहरातील रेसिडेन्सिअलसह अन्य काही शाळांत इंग्रजीमध्ये कुणबी नोंदी सापडल्याचे शिक्षण विभागाकडून समजले.

शिक्षण विभागातून सुमारे 5 हजार शाळांच्या दप्तराची त्या त्या मुख्याध्यापकांकडून पडताळणी पूर्ण होत आहे. यात 12 हजार 145 नोंदी या कुणबी म्हणून आढळल्या आहेत. यात इंग्रजीतीलही काही नोंदी दिसल्या. सर्व नोंदींच्या दस्तावेजाचे तहसील पातळीवरून स्कॅनिंग सुरू आहे.
                                 – बाळासाहेब बुगे, कक्ष अधिकारी, शिक्षण विभाग

Back to top button