Pune News : …अन् हजारो एलईडी दिव्यांनी उजळले रस्ते | पुढारी

Pune News : ...अन् हजारो एलईडी दिव्यांनी उजळले रस्ते

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्राहकांसाठी खरेदीचे प्रमुख आकर्षण असलेल्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्त्याला 101 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हजारो एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 1922 सालापासून आजतागायत पुणे शहर, परिसर इतकेच नव्हे तर जिल्ह्यातून खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांच्या दिवाळी खरेदीची रंगत वाढावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनादरम्यान बोलताना आयुक्त कुमार म्हणाले, खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. फक्त पुण्यातूनच नव्हे, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून ग्राहक लक्ष्मी रस्त्याला महत्त्वाच्या खरेदीसाठी येतात. 1922 पासून ही परंपरा सुरू आहे.

यावर्षी लक्ष्मी रस्त्याचे नामकरण होऊन 101 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने येथील सर्व व्यापार्‍यांनी एकत्र येऊन केलेली विद्युतरोषणाई ही स्तुत्य आहे. तर, इंग्रजांच्या काळात लक्ष्मी रस्त्याची ईस्ट – वेस्ट रस्ता अशी नोंद आढळते. कोरोनामुळे गेल्या वर्षी लक्ष्मी रस्त्याला 100 वर्षे पूर्ण झाल्याचे आम्ही साजरे करू शकलो नाही; परंतु आता 101 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत आम्ही सुमारे 3 किलोमीटर लांब इतकी विद्युतरोषणाई लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता व बाजीराव रस्ता या तीन प्रमुख रस्त्यांवर केली असल्याचे अध्यक्ष रांका यांनी नमूद केले. पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएसन व पुणे सरफा असोसिएशनच्या वतीने ही रोषणाई करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Pune News : मराठी रंगभूमी दिन विशेष : मराठी नाटकांचा झेंडा सातासमुद्रापार

जळगाव : जिल्ह्यात कुणबी पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

पंतप्रधान मोदींचे विमान उतरले गोंदियात; प्रफुल्ल पटेल स्वागताला

Back to top button