Pimpri : पालक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचा समन्वय वाढवा : आयुक्त शेखर सिंह | पुढारी

Pimpri : पालक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचा समन्वय वाढवा : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पालक, मुख्याध्यापक व विद्यार्थी यांचा समन्वय वाढण्यावर भर द्यावा. या माध्यमातून निश्चितपणे शाळेचा दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शाळा व्यवस्थापन समितीला केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, वक्ते भौतिकशास्त्रज्ज्ञ डॉ. दीनेश नेहेते, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.आयुक्त सिंह म्हणाले की, विद्यार्थ्यांना रोज शाळेत येण्यासाठी कसे प्रोत्साहन देण्यात येईल किंवा कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील यावर समितीने काम केले पाहिजे.

पालकांनीही कामातून वेळ काढून आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थ्याचा अभ्यास, आरोग्य, शारिरिक, सर्वांगीण प्रगतीबाबत पालकांनी संवाद साधला पाहिजे. ’मुलांच्या विकासात पालकांची भूमिका’ या विषयावर बोलताना डॉ. दीनेश नेहेते म्हणाले की, शाळेप्रमाणे घरातील किंवा घराच्या आजूबाजूचे वातावरणही सुरक्षित असणे गरजेचे आहे. मुलांना ज्या गोष्टी माहिती नाहीयेत त्या गोष्टींबद्दल त्यांना अवगत करून देणे महत्वाचे आहे. शाळेत काय शिकविले यांची विचारपूस पालकांनी करावी.

पालकांनी पाल्यांना शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पराभूत झाला तरी, स्पर्धेतून त्याला काय शिकायला मिळाले याबद्दलही पालकांनी पाल्याची विचारपूस करावी. प्रदीप जांभळे म्हणाले की, शिक्षक, पालक, मुख्याध्यापकांना कोणतीही समस्या आढळल्यास थेट सारथी पोर्टलद्वारे ते महापालिकेस याबाबत अवगत करू शकतात. येत्या काही दिवसांत पवित्र पोर्टल कार्यान्वित केले जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button