Pune News : नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन कधी? | पुढारी

Pune News : नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन कधी?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोहगाव येथील जुने विमानतळ टर्मिनल प्रवाशांकरिता अपुरे पडत आहे, अशी स्थिती असताना दुसरीकडे येथे शेजारीच नव्याने तयार झालेले टर्मिनल अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. हे नवे टर्मिनल सुरू करण्याला विमानतळ प्रशासनाकडून दिरंगाई का होत आहे, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
लोहगाव येथील विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाला 180 ते 190 च्या घरात येथून देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे होत असून, दररोज 25 ते 30 हजारांच्या घरात प्रवाशांची ये-जा सुरू असतेे. या सर्व प्रवाशांना जुने टर्मिनल सध्या अपुरे पडत आहे, असे असतानाही उदघाटनासाठी नवे टर्मिनल सुरू करण्याला उशीर का केला जात आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोणाच्या हस्ते होणार उद्घाटन

लोहगाव येथील बहुप्रतीक्षित नवीन विमानतळ टर्मिनलचे काम आता पूर्ण झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर ही चर्चा एकदम शांत झाली. आता या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनासाठी विमानतळ प्रशासन कोणाची वाट पाहत आहे? असा सवाल पुणेकर प्रवाशांकडून केला जात आहे.

टर्मिनलची क्षमता

जुने विमानतळ टर्मिनल : 22 हजार चौरस मीटर
नवीन विमानतळ टर्मिनल : 5 लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ
जुन्या टर्मिनलची प्रवासी क्षमता : 80 लाख प्रवासी (वार्षिक)
नवीन टर्मिनल प्रवासी क्षमता : 1 कोटी 90 लाख (वार्षिक)

नव्या टर्मिनलवर या सुविधा मिळणार

  • प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग बि—ज)
  •   8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर)
  • 15 लिफ्ट
  • 34 चेक-इन काउंटर
  • प्रवासी सामान वहन यंत्रणा
  • आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्ट
मला कामानिमित्त अनेकदा विमानाने प्रवास करावा लागतो. या वेळी विमानतळावर माझ्यासह अनेक प्रवाशांची जुन्या विमानतळ टर्मिनलवर गर्दी दिसते. प्रशासनाने नवीन टर्मिनल लवकरात लवकर सुरू केले तर आमच्यासारख्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असून, प्रशस्त सुविधा मिळतील.
– जयदीप पाटील, प्रवासी
हेही वाचा

Back to top button