धक्कादायक ! चालत्या वाहनात गर्भलिंगनिदान, गर्भपात | पुढारी

धक्कादायक ! चालत्या वाहनात गर्भलिंगनिदान, गर्भपात

सीताराम लांडगे

लोणी काळभोर : गरोदर महिलांची लिंगनिदान चाचणी करून मुलगी असेल तर गर्भपात करणारी टोळी गेल्या अनेक दिवसांपासून हवेली तालुक्याच्या पूर्व भागात कार्यरत आहे. धावत्या वाहनात ही टोळी हे दुष्कृत्य करीत आहे. हप्तेखोरीच्या लालसेपोटी स्थानिक आरोग्य विभाग डोळेझाक करीत आहे. या गंभीर प्रकरणात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. लिंगनिदान चाचणी करण्यासाठी मोठ्या रुग्णालयात अथवा सोनोग्राफी सेंटरमध्ये जावे लागते. परंतु, कायद्याचे बंधन, आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणेचा छापा पडण्याची भीती असल्याने हे रॅकेट एका चारचाकी वाहनातून चालविले जात आहे. या वाहनात सर्व यंत्रणा बसवून हे गुन्हेगारी कृत्य केले जात आहे. या रॅकेटमध्ये वाहनचालक लिंगनिदान चाचणी करणारे, गर्भपात करणारे, औषधपुरवठा करणारे असे आळीपाळीने काम करणारी मोठी टोळी कार्यरत आहे.

संबंधित बातम्या :

एखाद्या गर्भवती महिलेची लिंगनिदान चाचणी करायची असल्यास त्या महिलेच्या डोळ्याला पट्टी बांधून चारचाकी वाहनामध्ये बसवून चाचणी केली जाते, जर मुलगी असेल तर गर्भपात करण्यासाठी दौंड तालुक्यातील यवत, भुलेश्वर, पाटस परिसरातील अशा निर्जनस्थळी वाहन नेऊन चालू वाहनात महिलेचा गर्भपात केला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी पन्नास हजारांपासून ते एक लाखापर्यंत खर्च घेतला जातो. एक ते सहा महिन्यांपर्यंतच्या स्त्रीभ्रूणाचा गर्भपात केला जातो. टोळी हे गुन्हेगारी कृत्य गेल्या अनेक महिन्यांपासून बिनदिक्कतपणे करीत आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेला हे सर्व माहीत असतानाही गुन्हा दाखल करण्याचे अथवा छापा टाकण्याचे धाडस ते करीत नाहीत. विभागीय किंवा राज्यपातळीवरूनच शासनाच्या आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे, तरच या गंभीर प्रकाराला आळा बसेल; अन्यथा हे निर्दयी टोळके अनेक मुलींना जन्म घेण्यापूर्वीच मारेल, हे निश्चित आहे.

Back to top button